युक्रेनमध्ये रशियाचा जाळ; मालेगावमध्ये महागाईचा बार, गोडेतेल 20 रुपयांनी भडकले

| Updated on: Mar 03, 2022 | 11:10 AM

युक्रेन-रशिया युद्धाचा फायदा घेण्याचा प्रयत्न अनेक व्यापारी करत आहेत. अनेकांनी तेलाची साठेबाजी सुरू केल्याचे समजते. त्यामुळे बाजारपेठेत तेलाची मागणी जास्त आणि पुरवठा कमी, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. असे झाले तर येणाऱ्या काळात गोडेतेलाचे भाव अजून वाढण्याची भीती आहे.

युक्रेनमध्ये रशियाचा जाळ; मालेगावमध्ये महागाईचा बार, गोडेतेल 20 रुपयांनी भडकले
रशिया-युक्रेन युद्धाने गोडेतेलाचे भाव वाढले.
Follow us on

मालेगावः आक्रमतेबाबत हिटलरच्या पंक्तीत जावून बसण्याचे कृत्य करणाऱ्या रशियाच्या (Russia) पुतीनने युक्रेनमध्ये (Ukraine) जाळ निर्माण केलाय. बहुतांश देशांच्या इशाऱ्याला न जुमानता त्यांनी आपले आक्रमण सुरूच ठेवले आहे. जग तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करत आहे का, अशी भीती जागतिक तज्ज्ञ व्यक्त करतायत. त्याचे काय परिणाम होणार, याची चिंता साऱ्यांना लागलीय. मात्र, तूर्तास तरी या युद्धाने (war) नाशिक, मालेगावसह महाराष्ट्रात महागाईचा बार उडवल्याचे समोर येत आहे. एकीकडे निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे गोडेतेलाच्या किमतीत सध्याच लिटरमागे 20 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

चार दिवसांत वाढ

रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मालेगावमध्ये भयंकर परिणाम जाणवत आहेत. त्याचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार आहे. कारण खाद्य तेलाचे भाव चार दिवसांतच लिटरमागे वीस रुपयांनी महाग झाले आहेत. शेंगादाणे, करडई, सूर्यफूल, सोयाबीन या साऱ्याच तेलाच्या भावामध्ये वाढ झाली आहे. येणाऱ्या काळात गोडेतेलाचे दर अजून वाढतील, अशी शक्यता तेल व्यापारी रामकृष्ण बेंडाळे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे.

साठेबाजी केल्यास कारवाई

युक्रेन-रशिया युद्धाचा फायदा घेण्याचा प्रयत्न अनेक व्यापारी करत आहेत. अनेकांनी तेलाची साठेबाजी सुरू केल्याचे समजते. त्यामुळे बाजारपेठेत तेलाची मागणी जास्त आणि पुरवठा कमी, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. असे झाले तर येणाऱ्या काळात गोडेतेलाचे भाव अजून वाढतील. त्यामुळे कोणही साठेबाजी करू नये, असे आवाहन मालेगावचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी केले आहे. साठेबाजी रोखण्यासाठी पथकांची स्थापना करून कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

इंधन भडकण्याची भीती

दरम्यान, युक्रेन-रशिया युद्धामुळे एकीकडे सोने महाग होत आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोन्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकाचा निकाल मार्च महिन्यात आहे. या निकालाची घोषणा झाल्यानंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसे झाले, तर पुन्हा महागाई भडकेल. याचा फटका सर्वसामान्यांना बसेल.

इतर बातम्याः

युक्रेनहून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू देणार नाही, पंतप्रधानांशी बोलणार; मंत्री देशमुखांची ग्वाही

कोट्यवधींची उड्डाणे घेणाऱ्या साहित्य संमेलनाचा हिशेब द्या; नाशिकमध्ये निमंत्रकांना घरचा आहेर

Nashik | गाडगेबाबांच्या धर्मशाळेत 85 वर्षांपासून अविरत अन्नछत्र; वंचिताचा अनोखा आधारवड!