पुणे : आपण शेळ्या-मेंढ्यांचा बाजार पाहिला आहे, बैलांचा बाजार पाहिला आहे, घोड्यांचा बाजार पाहिलाय, परंतु कधी गाढवांचा बाजार पाहिलाय का? परंतु जेजुरीत वर्षानुवर्षे हा बाजार भरतोय. विशेष म्हणजे यंत्रांच्या युगात जनवारांचा वापर कमी झाला असला तरी जेजुरीतल्या या गाढवांच्या बाजारात दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होत असते. यावर्षी कोरोनामुळे गाढवांची आवक कमी झाली आहे. मात्र वर्षानुवर्षे चाललेल्या परंपरेनुसार गाढवांचा बाजार यावर्षीही भरला आहे, ही बाब सध्या खूप समाधानकारक आहे.
पौष पौर्णिमा जसजशी जवळ येते तसं जेजुरीला वेध लागतात ते यात्रेचे. या यात्रेचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य म्हणजे वर्षानुवर्षे येथे भरवला जाणारा गाढवांचा बाजार. जेजुरीतील बंगाली पटांगणात हा बाजार भरवला जातो. राज्यासह परराज्यातील व्यापारी या बाजारासाठी येत असतात. दोन दातांचे दुवान, चार दातांचे चौवान, कोरा, अखंड जवान अशा विविध प्रकारच्या गाढवांची या बाजारात विक्री होत असते. सध्याच्या काळात यांत्रिकीकरणामुळे गाढवांचा वापर कमी झाला आहे. मात्र तरिदेखील या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
गाढवांची किंमत कशी ठरते?
दात, रंग पाहून गाढवांची किंमत ठरवली जाते. वर्षानुवर्षे हा बाजार परंपरेनुसार भरवला जातोय. मात्र वर्ष सरतील तशी या बाजारातील उलाढाल कमी होताना दिसत आहे. तब्बल एक हजाराहून अधिक गाढवांची या बाजारात विक्री होत असते.
12 बलुतेदारांची यात्रा
जेजुरीत भरणाऱ्या पौष पौर्णिमेच्या यात्रेला 12 बलुतेदारांची यात्रा म्हणून ओळखलं जातं. प्रामुख्याने वैदू, बेलदार, कैकाडी, माती वडार, गारुडी, कुंभार आदी समाजबांधवांचा या यात्रेत समावेश असतो. एकूणच काय तर हा संपूर्ण यात्रा कार्यक्रम इथे येणाऱ्या भाविकांसाठी एक वेगळं आकर्षण असतं.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी
यंदा आलेल्या कोरोंनाच्या संकटामुळे जेजुरीच्या पौष पौर्णिमा यात्रेवर काही निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनामुळे भाविकांना गर्दी न करण्याचे आवाहन करत संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. मात्र या परिस्थितीतदेखील गाढवांचा बाजार परंपरेनुसार भरवण्यात आला आहे. नेहमीच्या तुलनेत यावर्षी गाढवांची आवकही काही प्रमाणात घटली आहे. मात्र परंपरा विस्कळीत झाली नाही एवढंच काय ते समाधान येथील व्यापाऱ्यांनी आणि भाविकांनी व्यक्त केले.
हेही वाचा
फुलांच्या माळा, खणानारळाची ओटी, गायीच्या डोहाळे जेवणानिमित्त उठल्या गावभर पंगती
कचरा वेचणाऱ्या मावशीने कुत्र्याचा जीव वाचवला, नेटीझन्सकडून कौतुकाचा वर्षाव
मुलींनी व्हॅलेंटाईन डेच्या आधी बॉयफ्रेंड बनवणं बंधनकारक, महाविद्यालयाच्या नोटीसवरुन गदारोळ
(unique donkey market in Jejuri Yatra)