नाशिकः महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विद्यार्थी परिषदेची 2021 मधील निवडणूक बिनविरोध झाली. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल (डॉ.) माधुरी कानिटकर (निवृत्त), कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, विद्यार्थी कल्याण विभागचे प्र. संचालक संदीप कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.
अधिसभेवर तीन सदस्यांची निवड
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998 कलम 23(2)(टी) नुसार विद्यापीठाच्या अधिसभेवर तीन विद्यार्थी प्रतिनिधी निवडून देण्याची तरतूद आहे. त्यानुसार निवडणूक प्रक्रियेद्वारे मुंबईच्या नायर हॉस्पिटल दंत महाविद्यालयाचा ओमकार उमेश शिंदे, कोल्हापूरच्या आर. सी. एस. एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा केतन सुनील ठाकूर, बीडच्या एस. के. होमिओपॅथी महाविद्यालयाचा ऋषिकेश संतोषजी जेठालिया या तीन सदस्यांची विद्यापीठाच्या अधिसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.
अध्यक्षपदी शेळके
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998 अन्वये विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवर एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, एक सचिव आणि दोन सहसचिव निवडून देण्याची तरतूद आहे. यानुसार विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी राहुरीच्या एस. व्ही. एन. एच.टी. आयुर्वेद महाविद्यालयाचा कृष्णा तुकाराम शेळके याची निवड झाली आहे. तसेच उपाध्यक्षपदी पुण्याच्या एस. के. जिंदाल महाविद्यालयाचा अंकुश विलास गोरे, तसेच मुंबईचे तेरणा फिजीओथेरपी महाविद्यालयाचा लोकहित धमेंद्र अडे यांची निवड झाली आहे. सचिव पदाकरिता नागपूरच्या एस. के.आर. पांडव आयुर्वेद महाविद्यालयाची वर्दा प्रकाश कर्णिक, सहसचिव पदाकरिता औरंगाबादच्या कमलनयन बजाज परिचर्या महाविद्यायाचा जयेश निरंजन घोरपडे आणि नाशिकच्या एम. व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाची आदिती अजय मुंदडा यांची निवड झाली आहे.
कुलगुरूंच्या शुभेच्छा
विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना कुलगुरू डॉ. कानिटकर म्हणाल्या की, विद्यापीठाच्या सर्वोच्च मंडळावर आपली निवड झाली असल्याने आपले अभिनंदन करते. विद्यापीठाचा उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. विद्यार्थ्यांच्या अडचणी किंवा शैक्षणिक समस्या असल्यास विहित मार्गाने विद्यापीठाकडे सादर कराव्यात. विद्यापीठाचे कार्य जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रत्येक उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून जबाबदारीने व शिस्तीने काम करावे. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी कार्य करून आदर्श निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले. कोविडच्या काळात आरोग्य क्षेत्रातील सर्वांनी उल्लेखनीय काम केले आहे. विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात याचा महाविद्यालय, परिसारात माहितीचा प्रसार व प्रचार करावा असे आवाहनही त्यांनी केले.
परिषदेबाबत माहिती
विद्यापीठ परिषद निवडणूक प्रारंभी उपस्थित विद्यार्थी प्रतिनिधींना विधी अधिकारी संदीप कुलकर्णी यांनी विद्यार्थी परिषदेबाबत थोडक्यात माहिती दिली. यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रशासन विभागाचे राजेंद्र नाकवे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता बाळू पेंढारकर, किशोर पाटील उपस्थित होते. या निवडणूक प्रक्रियेकरिता राजेश इस्ते, शैलजा देसाई, आबाजी शिंदे, रमेश पवार यांनी परिश्रम घेतले. विद्यापीठ अधिसभा व विद्यार्थी परिषदेवरील निवड झालेल्या सदस्यांचे विद्यापीठ परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
Nashik| 100 कोटींचा TDR Scam; महाालिका आयुक्तांकडून उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत, ऐन निवडणुकीत धुरळा!