पुणे : महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचा धोका उद्भवला आहे. अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात हाहाकार उडालेला असताना हे संकट अद्यापही टळलेलं नाही, असं चित्र सध्या दिसत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये आज अवकाळी पाऊस पडलाय. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुबंईत काल रात्री अचानक पाऊस पडला. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मुंबईत पडलेल्या या पावसामुळे पोलीस भरतीसाठी अंधेरीत आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. याशिवाय अचानक आलेल्या पावसामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी घेतली जात असलेल्या मरोळ मैदानाची दुरावस्था झालीय. त्यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी आता कलीना मैदानात घेतली जात आहे. असं असताना आता पावसाबद्दल पुन्हा मोठी अपडेट समोर आली आहे.
राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस हाहाकार माजवण्याची भीती आहे. राज्यात सध्याच्या स्थितीला अनेक ठिकाणी पाऊस पडतोय. ही परिस्थितीत पुढचे चार दिवस जैसे थे राहण्याची दाट शक्यता आहे. कारण हवामान विभागाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी ही धोक्याची घंटाच आहे. राज्यात आधीच अवकाळी पावसाने शेतीचं प्रचंड नुकसान केलंय. असं असताना आता पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे राज्याच्या बळीराजाला पुन्हा या संकटाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पुढील चार दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय आज पुणे, पालघर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडल्याची माहिती मिळत आहे. विदर्भात 13 ते 17 एप्रिलपर्यंत पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भ ते उत्तर कर्नाटकात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तो मराठवाड्यातून जातोय. त्यामुळे मराठवाड्यात वातावरण ढगाळ बनलंय. त्यामुळे संबंधित परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, धूळे, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, सोलापूर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह गारांचादेखील पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात आज संध्याकाळी पाऊस पडलाय. मात्र हवामान विभागाकडून पुण्यात 13 आणि 14 एप्रिलला ढगाळ वातावरण राहिल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात 17 तारखेपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे.