Weather Alert | महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखा, रब्बी पिकांसह फळबागा, भाजीपाल्याचे मोठे नुकसान

| Updated on: Mar 20, 2021 | 8:50 PM

पुढील दोन दिवस पावसाची हीच परिस्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. (Unseasonal rains hit Maharashtra, major damage to orchards, rabbi crops, vegetables)

Weather Alert | महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखा, रब्बी पिकांसह फळबागा, भाजीपाल्याचे मोठे नुकसान
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखा
Follow us on

मुंबई : एकीकडे देशभरात उन्हाच्या झळा बसत आहेत तर दुसरीकडे राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे. निफाड, पिंपळगाव, नाशिक, दिंडोरी, कराड आणि आणखी काही ठिकाणी आधीपासून महाराष्ट्रात मागील काही तासांत गारपीट, विजेच्या कडकडाटासह पावसाची नोंद करण्यात आली. याशिवाय जळगाव, धुळे आणि नंदुरबार, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातही विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस पावसाची हीच परिस्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. (Unseasonal rains hit Maharashtra, major damage to orchards, rabbi crops, vegetables)

रब्बी पिकांचे मोठे नुकसान

अकोल्यात गारांसह जोरदार पाऊस पडला. जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. या पावसामुळे गहू, हरबरा, पिकाचे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकरी पुन्हा संकटात आला आहे. जळगावमध्ये जामनेर तालुक्यातील तोंडापूर परिसरात गारांचा तुरळक पाऊस पडला असून रब्बीचा काढलेला गहू, हरभरा ओला झाला. तर रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात ढगाळ वातावरणासह विजेचा कडकडाट सुरू आहे.

विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस

विदर्भात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, आंबा, संत्री, चणा, भाजीपाला, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाशिममध्ये मंगरुळपिर तालुक्यातील शेलुबाजार परिसरात काल रात्री झालेल्या पावसानंतर आता पुन्हा जोरदार अवकाळी पावसासह गारपीट सुरू आहे. यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णता हतबल झाला आहे. तालुक्यातील अनेक भागांतील शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस, वादळामुळे संत्री, गहू, चणा, भाजीपाला, फळपिकांच अतोनात नुकसान झालं आहे. आर्वी तालुक्यात वीज पडून एका जनावराचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर शहरातही सकाळपासून ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर पहायला मिळाला.

मराठवाड्यालाही गारपीटीचा फटका

परभणीच्या सोनपेठ तालुक्यात गारपीटीचा तडाखा बसलाय. यामुळे हाता तोंडाशी आलेल्या गहू हळद हरभरा ज्वारी भाजीपाला या पिकांचं नुकसान झालंय. हवामान विभागाने राज्यात तीन दिवस अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील पालम पूर्णा गंगाखेड भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तर सोनपेठ तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा वर्षाव झालाय. निळा वंदन आणि उखळी गाव परिसरात बोराच्या आकाराच्या गारा कोसळल्या असून यामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय. परिसरातील शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. (Unseasonal rains hit Maharashtra, major damage to orchards, rabbi crops, vegetables)

इतर बातम्या

‘बादशाह को बचाने के लिए कितनो की जान जाएगी?’ अमृता फडणवीसांचं खोचक ट्विट

आधी आबांकडून चार्ज, आता अनिल देशमुखांकडून पदभार? जयंत पाटलांचं नाव गृहमंत्रीपदाच्या रेसमध्ये!