कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेची (kdmc) निवडणूक सहा महिन्यात कधीही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आजीमाजी नगरसेवकांनी तिकीट मिळण्यासाठी आतापासूनच लॉबिंग सुरू केली आहे. तसेच विविध समाजघटकही तिकीट मिळवण्यासाठी सेटिंग करताना दिसत आहेत. कल्याण-डोंबिवलीतील उत्तर भारतीय नेतेही यात मागे नाहीत. महापालिकेचं तिकीट मिळवण्यासाठी लॉबिंग करतानाच या उत्तर भारतीय नेत्यांनी मनातील खदखदही बोलून दाखवण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी काँग्रेस (congress) आमची प्रतिष्ठा होती. या काँग्रेसने उत्तर भारतीयांना गृहराज्यमंत्रीपद दिलं. मुंबई महापालिकेत तीनतीन महापौर दिले. आज मात्र, नगरसेवकपदाच्या तिकीटाची भीक मागावी लागत आहे, अशी मनातील खदखद उत्तर भारतीय नेत्यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे या उत्तर भारतीय नेत्यांची (uttar bhartiya leader) काँग्रेस कशा पद्धतीने समजूत काढतेय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
होळी निमित्ता डोंबिवली पूर्वेकडील पिंपळेश्वर मंदिर परिसरात हिंदी भाषा जनता परिषदेने एका कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे आनंद दुबे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सल्लागार वंशीधर उपाध्याय उपस्थित होते. या कार्यक्रमाला उत्तर भारतीयांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी उत्तर भारतीय नेत्यांनी सर्वपक्षीय नेत्यांकडे आपली व्यथा मांडली. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख विश्वनाथ दुबे यांनी येणाऱ्या काळात आम्हाला प्रतिनिधीत्व दिलं गेलं नाही तर आम्ही आमचा निर्णय घेऊ आणि राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवू, असा सज्जड इशारा दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पूर्वी काँग्रेस उत्तर भारतीयांची प्रतिष्ठा होती. या राज्यात उत्तर भारतीय गृहराज्यमंत्री झाला. महापौरही उत्तर भारतीय झाला. पण आता आम्हाला साध्या नगरसेवकपदाच्या तिकीटासाठी भीक मागावी लागत आहे. कल्याण लोकसभेत 3 लाख 80 हजार उत्तर भारतीय मतदार आहेत. फक्त आमचा वापर केला जातोय. या राज्याच्या विकासात आम्ही सोबत आहोत. निवडणुकीत आम्ही काम करतो. मात्र आम्हाला प्रतिनिधित्व दिलं जात नाही, अशी खंत दुबे यांनी व्यक्त केली.
कल्याण पूर्व आणि कल्याण ग्रामीणमध्ये आम्ही उत्तर भारतीय आमदार निवडून आणू शकतो. आम्हाला संधी न देणाऱ्या राजकीय पक्ष आणि नेत्यांना त्यांची जागा दाखवण्याचा आम्ही संकल्प केला आहे, असा इशाराही दुबे यांनी दिला. त्यामुळे राजकीय पक्षांची पाचावर धारण बसली आहे.
संबंधित बातम्या:
MIMला आघाडीत घ्यायचं की नाही हे वरिष्ठ नेते ठरवतील, राजेश टोपेंच्या विधानाने शिवसेनेची कोंडी?
संसार फुलण्याआधीच रंग उडाले, धुळवड खेळून आलेल्या तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू
Holi | रंग लावू नये म्हणून गच्चीत पळाला, इमारतीतून पडून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू