वंचितचा दे धक्का! उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 11 जागांसाठी मोठी घोषणा

| Updated on: Mar 31, 2024 | 9:19 PM

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. महाविकास आघाडीकडून एकीकडे वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरु असल्याचा दावा केला जात असाताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीने आपल्या पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलीय. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

वंचितचा दे धक्का! उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 11 जागांसाठी मोठी घोषणा
prakash ambedkar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 11 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये हिंगोली मतदारसंघासाठी डॉ. बी. डी. चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर लातूरमध्ये नरसिंहराव उदगीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचितच्या पहिल्या यादीत एकूण 8 जागांचा समावेश होता. तर दुसऱ्या यादीमध्ये 11 जागांचा समावेश आहे. यामध्ये मुंबईतील उत्तर मध्य जागेवर वंचित बहुजन आघाडीने उमेदवार मैदानात उतरवला आहे. उत्तर मध्य मुंबईतून अब्दुल खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून 48 लोकसभेच्या जागांपैकी 19 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. वंचितने नागपुरात काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केलाय.

वंचित बहुजन आघाडीकडून सोलापुरात राहुल गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माढा मतदारसंघातून रमेश बारस्कर यांना उमेदवारी जाहीर झालीय. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मारुती जानकर यांना उमेदवारी जाहीर झालीय. तर धुळे लोकसभा मतदारसंघातून अब्दुर रहमान, हातकणंगले मतदारसंघातून दादासाहेब पाटील, रावेरमधून संजय पंडीत ब्राह्मणे, जालन्यातून प्रभाकर बाकळे, उत्तर मध्य मुंबईमधून अब्दुल खान आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गातून काका जोशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

याआधी जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी

  • अकोला – प्रकाश आंबेडकर
  • भंडारा-गोंदिया – संजय केवट
  • गडचिरोली-चिमूर- हितेश मडावी
  • चंद्रपूर – राजेश बेले
  • बुलडाणा – वसंत मगर
  • यवतमाळ-वाशिम – खेमसिंग पवार
  • वर्धा – राजेंद्र साळुंके
  • अमरावती – प्राजक्ता पिल्लेवान

महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता

वंचित बहुजन आघाडीने तब्बल 19 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केल्याने महाविकास आघाडीला त्याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. कारण वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी या दोघांना महायुतीच्या उमेदवारांचा पराभव करायचा आहे. महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करणं ही दोघांची प्राथमिकता आहे. यासाठी दोघांनी एकत्र येणं आवश्यक होतं. पण जागावाटपात एकमत न झाल्याने आता प्रकाश आंबेडकर यांनी वेगळा मार्ग निवडला आहे. पण त्यांच्या या मार्गाचा सर्वाधिक फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. तसेच महाविकास आघाडीला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.