Prakash Ambedkar On Ladki Bahin Yojana : राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. सध्या या योजनेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. असंख्य महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेवरुन विरोधक टीका करताना दिसत आहेत. त्यातच केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी सध्या अनुदानाचे पैसे मिळतील का याची शाश्वती नाही कारण लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागत आहे असे वक्तव्य केले होते. आता यावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय नेते हे आखाड्यात उतरले आहेत. त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेला कोणते पैसे दिले जातात याबद्दलही मोठा खुलासा केला.
आम्ही नागपुरात आदिवासी परिषद घेतली. सध्या आम्ही राज्यातील सर्वांना एकत्र करत आहोत. विविध संघटना एकत्र करत आहोत. आम्ही निवडणूक लढत आहोत. धनगर समाजाने पायावर धोंडा पाडून घेतला आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वाच्च न्यायालयाने याबद्दल निर्णय दिला आहे. आम्ही काही धनगर समाजातील नेत्यांना कोर्टात जाऊ नका, असे सांगितले होते. धनगर आणि धनवट हे दोन वेगळे समाज आहेत. ते एकत्र आणता येत नाही. त्यामुळे थेअरीच्या दृष्टीकोनातून निकाल काढता येणार नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जे करायला निघाले, ते कायदेशीर नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात सव्वा लाख बोगस आदिवासी असल्याचे आढळले. आदिवासी समाजाचे मोर्चे आले, भरती, जागा ताबडतोब भरणे या सर्व गोष्टी झाल्या. पण लाडक्या बहिणीसाठी आदिवासींचे बजेट वर्ग केले जात आहे”, असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकरांनी केला.
यानंतर प्रकाश आंबेडकरांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलही भाष्य केले. “मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुका लढवल्या नाहीत. त्यांच्यावर पहिल्यांदा आरोप झाला की त्यांना देवेंद्र फडणवीस चालवत आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव समोर आले. त्यानंतर आता शेवटचा आरोप झाला की शरद पवार त्यांना चालवत आहेत. त्यामुळे आता जर ते लढले नाही तर हा स्टँड पक्का होईल”, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले.