शरद पवार धर्मनिरपेक्ष नाहीत; प्रकाश आंबेडकर यांचा धक्कादायक दावा

| Updated on: May 17, 2024 | 1:51 PM

खासगीकरणाच्या माध्यमातून इथल्या मागासवर्गीयांच्या आणि वंचितांच्या नोकऱ्या घालवल्या जात आहेत. खासगीकरण कशासाठी आहे ? मालमत्ता लोकांची आहे आणि ती लोकांचीच राहिली पाहिजे, हे लक्षात घ्या असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी माजी मंत्री शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.

शरद पवार धर्मनिरपेक्ष नाहीत; प्रकाश आंबेडकर यांचा धक्कादायक दावा
Follow us on

लोकसभा निवडणुकीचा राज्यातील पाचवा आणि अखेरचा टप्पा जवळ आला आहे. येत्या 20 मे रोजी पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी महासभा आणि रोड शो करण्यावर भर दिला आहे. ही रणधुमाळी अत्यंत शिगेला पोहोचलेली असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी एक मोठा दावा केला आहे. आंबेडकर यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबाबतचा हा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

प्रकाश आंबेडकर हे टीव्ही9 मराठीशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबाबतचा दावा केला आहे. शरद पवार हे धर्मनिरपेक्ष असल्याचं खोटं सांगत आहेत. शरद पवार सेक्युलर नाही. मी त्यांना सेक्युलर मानत नाही. ते संधीसाधू आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तर उद्धव ठाकरे हे धर्मवादी आहेत हे उघड आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

राजकीय भूकंपाचे संकेत

यावेळी आंबेडकर यांनी राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत दिले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जातील. त्यांच्यामागे चौकशीचा सिसेमिरा आहे. शिवाय त्यांना राजकीय पुनर्वसन करून घ्यायचं आहे. त्यामुळे त्यांना भाजपसोबत जाण्याशिवाय गत्यंतर नाही. तर, शरद पवार हे संधीसाधू राजकारणी आहेत. तेही भाजपसोबत जातील, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे.

भाजप 250 पर्यंत जाईल

दरम्यान, कालच्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. 2014 आणि 2019 मध्ये भाजप 70 ते 72 टक्क्यांवर निवडणुका घेऊन गेले होते. ते आता 50 आणि 60 टक्क्यांवर आले आहे. मतदान कमी झाले आहे याचा फटका भाजपला बसणार आहे. आता ते 400 पार नव्हे 250 पर्यंत आलेले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत तमाशा होणार

लोकसभा निवडणुकीमधील तमाशा आपण बघत आहोत. बाप एका पक्षात तर पोरगा दुसऱ्या पक्षात आहे. सत्ता आपल्या कुटुंबातून जाता कामा नये अशी परिस्थिती आहे. शिवसेना(ठाकरे) यांची महाविकास आघाडीसोबत युती झाली आहे असे सगळ्या प्रचार सभेत सांगितले जाते, पण मुंबईच्या कोणत्याही सभेत राष्ट्रवादी (शरद पवार) यांचा कार्यकर्ता दिसत नाही आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील दिसत नाहीत. कदाचित मुंबईमध्ये तमाशा होणार आहे आणि या पक्षाचे तीनही नेते या तमाशात सहभागी असतील, असा दावाही त्यांनी केला.