मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे प्रमुख होणार असल्याची मध्यंतरी चर्चा होती. राज ठाकरे यांनीही या चर्चेची गंभीर दखल घेऊन अशा चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा ही चर्चा होताना दिसत आहे. त्याला निमित्त ठरलेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर. एकनाथ शिंदे यांच्याकडे जी शिवसेना आहे, त्याचे प्रमुख उद्या जर राज ठाकरे झाले तर आश्चर्य वाटायला नको, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आंबेडकर यांच्या या विधानामुळे राज ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख होणार का? अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
प्रकाश आंबेडकर नाशिकमध्ये होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांमध्ये रेस लावली आहे. ही लॉयल्टीची रेस आहे. गरज पडली तर उद्धव ठाकरे यांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याचं मोदी म्हणाले आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरे यांना प्रचाराला आणलं जात आहे. त्यांना प्रचाराला येण्यास मजबूर केलं जात आहे. दोन भावंडांमध्ये अधिक लॉयल्टी कुणाकडे आहे यामध्ये चुरस लावलेली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दोघेही भाजपसोबत असतील अशी परिस्थिती दिसत आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंची टीका दिखावा
मला उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची नाही. त्यांनी मुस्लिमांनीच प्रश्न विचारला होता. लोकसभा संपल्यानंतर भाजपसोबत समझोता करणार की नाही? हे मुस्लिमांनी उद्धव ठाकरे यांना विचारलं होतं. त्याचं उत्तर न देता उद्धव ठाकरे मोदींवर टीका करत आहेत. हा दिखावा आहे, असं मला वाटतं, असंही त्यांनी सांगितलं.
ज्या शिडीने वर आला…
आम्ही आमच्या भरवश्यावर आहोत. संघाच्या नाही, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे. त्यावरही आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चांगली गोष्ट आहे. ज्या शिडीने तुम्ही वर आलात. ती शिडी सोडायला तयार आहात. मागच्या दोन वर्षात मोदींनी तुम्हाला भेटायला वेळ दिली का? हे मी मोहन भागवत यांना विचारलं होतं. त्यावर त्यांनी अजून उत्तर दिलेलं नाही. आता नड्डा यांचं विधान आलं आहे. त्यावरून सर्व काही स्पष्ट होत आहे. भाजपला संघ नकोय असा त्याचा अर्थ निघतो, असं आंबेडकर म्हणाले.
मोदी खोटारडे, भाषा बदलली
राज्यात भाजपची धांदल उडाली आहे. मोदींना गल्लोगल्ली सभा घेण्याची वेळ आली आहे. आता मोदींची भाषाही बदलत आहे. संविधान बदलणार नसल्याचं ते सांगत आहे. बाबासाहेब आले तरी संविधान बदललं जाणार नाही, असं मोदी म्हणत आहे. मोदी हे खोटारडे आहेत. आम्ही घटना बदलणार आहात का? असं विचारणार नाही. तुम्ही घटना बदलणार आहात का? याचं उत्तर मोदींनी दिलं पाहिजे. खोटं बोलण्यासाठी शपथांवर शपथा घेतल्या जात आहेत, अशी टीका त्यांनी केली.
मोदींच्या गॅरंटीची काय गॅरंटी?
मोदी की गॅरंटी म्हणून मोदी सांगत आहे. मोदींनी इथे सर्वांना गॅरंटी दिली आहे. पण मोदींची गॅरंटी कोणी पाहिली आहे काय? मोदींच्या गॅरंटीची गॅरंटी काय? तुम्ही अग्नीसमोर घेतलेली गॅरंटी पाळू शकत नाहीत. तुमच्या गॅरंटीची काय गॅरंटी?, असा सवालही त्यांनी केला.