वर्धा | 19 फेब्रुवारी 2024 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आयाराम गयारामांना एक अजबच सल्ला दिला आहे. तुम्ही खुशाल भाजपमध्ये जा. लाज, लज्जा ठेवू नका. पण कुटुंबाला तुरुंगातून जाण्यापासून वाचवा, असा अजब आणि उपरोधिक सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. त्यांच्या या सल्ल्याची सध्या राज्यात जोरदार चर्चा आहे. वर्धा येथे आयोजित महाएल्गार सभेत आंबेडकर बोलत होते. या महाएल्गार सभेला मोठा जनसागर उसळला होता. त्यामुळे राज्यभर या सभेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
तुम्ही खुशाल जा. लाज लज्जा अजिबात ठेवू नका. पण, कुटुंबाला तुरुंगात जाण्यापासून वाचवा, असा उपरोधिक सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारलाही आव्हान दिलं. मोदी म्हणत आहेत की, आमच्या 400 जागा निवडून येतील. पण, आजच्या परिस्थितीत 150 जागा निवडून आणून दाखवा, असं आव्हानच प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे.
यावेळी भारत सोडून गेलेल्या नागरिकांची माहिती देखील त्यांनी उघड केली. 24 लाख कुटुंबे भारताचे नागरिकत्व सोडून गेली आहेत. ज्यांची स्थावर मालमत्ता 100 कोटींच्या आसपास होती. यात मुस्लीम आणि ख्रिश्चन नाहीत. ते सगळे हिंदू आहेत आणि यांचाच प्रचार आहे की, हिंदूचे सरकार आले पाहिजे. मग हे लोक भारत सोडून का गेले? असा सवाल आंबेडकर यांनी केला.
सध्या धाडी घालण्यासाठी राजकीय नेत्यांचा नंबर लागला आहे. परत मोदी सत्तेत आले, तर तुमचा नंबर आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही आता त्यांच्याकडून पैसे घ्या आणि मतदान करा. पण ते जिंकून आले तर ईडी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही. यामुळे मतदान करण्याच्याआधी विचारपूर्वक मतदान करा, असं आवाहन त्यांनी केलं.
या निवडणुकीत लोकशाहीसह संविधान वाचवलं पाहिजे. यासाठी मतदाराने लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी मी माझं मत भाजपविरोधी टाकणार असं गल्लोगल्ली, चौकाचौकात जाऊन सांगायला पाहिजे, अशी सादही त्यांनी घातली. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला घेरलं. हमीभावाचा कायदा करा असे आमचे म्हणणे आहे. जेणेकरून या कायद्याचं उल्लंघन केले तर त्या व्यापाऱ्यांवर कारवाई करता येईल. पण, हे सरकार लालाचं आहे. सामान्य माणसाचं नाही. यामुळे हे सरकार याकडे लक्ष देत नाही. मात्र, ज्या दिवशी सत्ता आपल्या हाती येईल, त्यादिवशी हमीभावाचा कायदा केल्याशिवाय राहणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.