मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (सीएसएमटी) पासून गोव्याच्या मडगाव स्टेशन दरम्यान भारतातील सर्वात अत्याधुनिक ट्रेन म्हणून ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस धावते. मात्र ही ट्रेन चक्क रस्ता चुकल्याचं समोर आलं आहे. ही ट्रेन गोव्याला निघाली होती, मात्र ती कल्याणला पोहोचल्याचं समोर आलं आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सीएसएमटी पासून गोव्याच्या मडगाव स्टेशन दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस चालवली जाते.मात्र ठाण्यामध्ये ही ट्रेन रस्ता चुकली ती दिवा स्टेशनवरून पनवेलकडे जाण्याऐवजी कल्याणच्या दिशेनं पुढे गेली.मात्र चूक लक्षात येताच रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली. त्यानंतर रस्ता चुकलेल्या या वंदे भारत एक्स्प्रेसला कल्याण स्टेशनमध्ये आणण्यात आलं. त्यानंतर पुढे काही वेळानं ती पुन्हा एकदा गोव्याच्या दिशेनं रवाना झाली, रस्त्या चुकल्यामुळे या ट्रेनला मडगाव स्टेशनला पोहोचण्यासाठी तब्बल 90 मिनिटं उशिर झाला.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वंदे भारत ट्रेन गोव्याला जाण्यासाठी सीएसएमटी स्थानकातून सुटली, पुढे दिला आपल्या निर्धारीत मार्गानं दिवा स्टेशनवरून पनवेलकडे जायचे होते. मात्र ती कल्याणच्या दिशेनं पुढे गेली. ही घटना सकाळी सहा वाजून दहा मिनिटांच्या आसपास घडली आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नील यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सर्व प्रकार सिग्नल यंत्रणेमध्ये निर्माण झालेल्या गडबडीमुळे झाला.दिवा जंक्शनच्या डाउन फास्ट लाईन आणि पाचव्या लाईनमधध्ये असलेल्या एका सिग्नलमध्ये आणि दूरसंचार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता,अशी माहिती जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली आहे.
दरम्यान या चुकीमुळे मुंबईच्या मध्य रेल्वेवरील लोकल सेवा देखील विस्कळीत झाली. याचा चांगलाच फटका हा चाकरमान्यांना बसला.रस्ता चुकल्याचं लक्षात येताच या ट्रेनला कल्याणला आणलं गेलं आणि त्यानंतर तिला पुन्हा एकदा मार्गस्थ करण्यात आलं.ही ट्रेन तब्बल 90 मिनिट उशिरानं गोव्याच्या मडगाव स्टेशनला पोहोचली. दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मध्य रेल्वेची सेवा देखील विस्कळीत झाली, याचा मोठा फटका हा सकाळी ऑफिसला जाण्यासाठी निघालेल्या चाकरमाण्यांना बसला.