दोन दिवसांपूर्वीच कल्याणच्या एका सोसायटीत अमराठी व्यक्तींनी एका मराठी इसमाला मारहाण केल्याची घटना घडली. शुल्लक मुद्यावरून झालेल्या वादानंतर अखिलेश शुक्ला नावाच्या इसमाने, त्याच्या पत्नीने आणि काही मित्रांनी धीरज देशमुख याला बेदम मारहाण केलीय गुरूवारी या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आणि हे प्रकरण विधानसभेपर्यंत जाऊन तापलं. राज ठाकरे, संजय राऊत या नेत्यांनीही या मुद्यावरून ठाम भूमिका घेत कारवाईची मागणी केली. हा सगळा वाद ताजा असून तो अद्याप शमलेला नसतानाच आता पेणमध्ये देखील मराठी वि हिंदी असा वाद रंगताना दिसत आहे. तेथे एका परप्रांतीय भाजी विक्रेत्या महिलेची अरेरावी समोर आली असून ‘मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो..’असं तिने उद्धटपणे म्हटल्याचंही उघड झालंय. यामुळे नवा वाद पेटू शकतो.
परप्रांतीय भाजी विक्रेत्या महिलेचा उद्धटपणा उघड
कल्याणमध्ये परप्रांतीय सरकारी कर्मचाऱ्यानं मराठी कुटुंबाला केलेल्या मारहाण प्रकरणामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. हे प्रकरण ताजे असतानाच पेण शहरात भाजी विक्री करणाऱ्या परप्रांतीय भाजी विक्रेती महिलेचा अरेरावी करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ही भाजी विक्रेती महिला ग्राहकांसोबत उद्धटपणे बोलत असून ,’मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो…’ असे ती ग्राहकाला हिंदीमध्ये सांगताना दिसत आहे. परप्रांतीय भाजी विक्रेती महिलेच्या या अरेरावीचा, उद्धटपणाचा, हा व्हिडिओ पेणमध्ये व्हायरल होत आहे. मराठी बोलण्यावरून वादाच्या या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा चर्चेत आला आहे. दरम्यान या परप्रांतीय महिलेविरूद्ध पेण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे पोलिसांना निवेदन देण्यात आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या परप्रांतीय भाजी विक्रेती महिलेला ताब्यात घेतले आहे.
ठाण्यात झाली होती महिलेला मारहाण
गुरुवारी कल्याणमधील एका हायप्रोफाईल सोसायटीमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला झाला, ही घटना ताजी असतानाच ठाण्यातूनही एक धक्कादायक घटना समोर आली. ठाण्यातील विवियाना मॉल प मॉलमधील परप्रांतीय सुरक्षा रक्षकाकडून महिला रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली. माहितीनुसार ठाण्यातील विविआना मॉलमधील परप्रांतीय सुरक्षा रक्षकाने महिला रिक्षा चालकाला मारहाण केली. मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाचं भाडं नाकारल्याच्या वादतून ही मारहाण झाल्याचे उघड झालं.
मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकानं या महिला रिक्षाचालकाकडे भाड्या बाबत विचारणा केली, मात्र या महिलेनं त्यांना आपल्या रिक्षातील गॅस संपला आहे, असं सांगितलं. त्यानंतर यावरून महिला रिक्षा चालक आणि या मॉलचा सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये वाद झाला. सुरक्षा रक्षकाने अरेरावीची भाषा केल्यामुळे महिला रिक्षा चालक त्याच्या अंगावर धावून गेली, त्यानंतर या सुरक्षा रक्षकाने महिलेला मारहाण केल्याचे समोर आले. या घटनेची दखल मनसेकडून घेण्यात आली.