नाशिक : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांवर कॉर्पोरेट धार्जिणे आणि शेतकरी विरोधी असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. तसेच कृषी कायदे रद्द करून शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण देण्याचीही मागणी होतेय. या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला आता महाराष्ट्रातूनही पाठिंबा वाढतोय. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने भव्य राज्यव्यापी वाहन मार्च आयोजित करण्यात येतोय. नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीदिनी (23 जानेवारी) दुपारी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथून शेकडो वाहने घेऊन सुमारे 20 हजार शेतकरी या वाहन मार्चमध्ये सहभागी होणार आहे (Vehicle March in Maharashtra to Support Farmer Protest in Delhi against Farm Laws).
नाशिक येथून निघालेला हा वाहन मार्च 23 जानेवारी रोजी सायंकाळी घाटनदेवी येथे रात्री मुक्कामी थांबेल. 24 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता घाटनदेवी येथून निघून 20 हजार शेतकरी कसारा घाट उतरून मुंबईच्या दिशेने कूच करतील. दिल्लीतील शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर 23 ते 26 जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपाल भवनांवर आंदोलन करण्याची हाक देण्यात आलीय. मुंबई येथील आझाद मैदान येथे या आवाहनानुसार सुरू करण्यात येत असलेल्या महामुक्काम सत्याग्रहात सामील होण्यासाठी किसान सभेचा हा वाहन मार्च 24 जानेवारी रोजी दुपारी सामील होईल.
वाहन मार्चमध्ये कोण सहभागी होणार?
राज्यभरातील 100 पेक्षा अधिक संघटनांच्या वतीने संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या झेंड्याखाली मुंबईतील हे महामुक्काम आंदोलन होणार आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती (महाराष्ट्र), कामगार संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र), जन आंदोलनांची संघर्ष समिती (महाराष्ट्र), नेशन फॉर फार्मर्स (महाराष्ट्र) आणि हम भारत के लोग (महाराष्ट्र) या पाच मंचांनी मिळून संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा तयार केला आहे.
अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डी.वाय.एफ.आय. ही युवक संघटना आणि एस.एफ.आय. ही विद्यार्थी संघटना महाराष्ट्रभरातील हजारो शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थ्यांना घेऊन या मार्चमध्ये सामील होणार आहेत.
25 जानेवारी रोजी आझाद मैदान येथे सकाळी 11 वाजता सभा होईल. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, डावे व लोकशाही पक्ष यांच्या प्रमुख नेत्यांसोबत अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस आणि दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाचे एक प्रमुख नेते माजी खासदार हनन मोल्ला या सभेस संबोधित करतील. सभेनंतर येथे जमलेले हजारो श्रमिक दुपारी 2 वाजता राज भवनाकडे कूच करतील आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करतील.
शेतकरी संघटनांच्या नेमक्या मागण्या काय?
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या मागण्या आंदोलनात करण्यात येणार आहेत.
26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर राष्ट्रध्वज फडकवून, राष्ट्रगीत गाऊन आणि शेतकरी-कामगारांचे हे आंदोलन विजयी करण्याचा निर्धार करून या महामुक्कामाची सांगता होईल. या वाहन मोर्चाच्या आयोजनात डॉ. अशोक ढवळे, जे.पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, सुनील मालुसरे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले इत्यादी नेत्यांचा समावेश आहे.
हेही वाचा :
आता अण्णाही म्हणणार ‘लावरे तो व्हिडीओ’, कोणत्या बड्या 9 नेत्यांची अडचण होणार?
मला हात लावू शकत नाहीत, गोळी घालू शकतात; राहुल गांधींचा खळबळजनक आरोप
व्हिडीओ पाहा :
Vehicle March in Maharashtra to Support Farmer Protest in Delhi against Farm Laws