ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन; पर्यावरण चळवळीवर शोककळा

| Updated on: Jul 25, 2024 | 11:57 AM

फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे धाराशीव (उस्मानाबाद) येथे पार पडलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे थोर साहित्यिक, लेखक असून, धार्मिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते.

ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन; पर्यावरण चळवळीवर शोककळा
Follow us on

Father Francis Dibrito Passed Away : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज गुरुवार (25 जुलै 2024) दीर्घ आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आज पहाटे 5 च्या सुमारास राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. साहित्यिक, पर्यावरणवादी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वासोबत पर्यावरण चळवळीवर शोककळा पसरली आहे.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे धाराशीव (उस्मानाबाद) येथे पार पडलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे थोर साहित्यिक, लेखक असून, धार्मिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. ‘हरित वसई संरक्षण समिती’च्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली होती. वसईतील ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण’ यांच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेत मोठी मोहीम राबववली होती.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी 3.30 वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरी (जेलाडी) येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजल्यापासून नंदाखाल येथील होली स्पिरिट चर्च येथे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यांचा अंत्यविधी मिस्सा हा आजच गुरुवारी 25 जुलै 2024 सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास होली स्पिरिट चर्चमध्ये होणार आहे.

अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निधनाने पर्यावरणवादी विचारांचा कृतीशील साहित्यिक पडद्याआड, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी मराठी साहित्य, सामाजिक आणि पर्यावरण चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे. भारतीय संस्कृती आणि संत साहित्याचा गाढा अभ्यास असलेल्या ख्रिस्ती धर्मगुरु फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी समाजात एकता, बंधुता, शांतता, सामाजिक सलोखा रहावा यासाठी व्याख्यानांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम केले.

‘सुवार्ता’ साप्ताहिकाच्या माध्यमातून पर्यावरण, नागरी, सामाजिक प्रश्न प्रभावीपणे हाताळले. हरित वसई चळवळीसाठी त्यांनी तळमळीने केलेले काम सदैव लक्षात राहील. त्यांच्या निधनानं पर्यावरणवादी विचारांचा कृतीशील साहित्यिक आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि अनुयायांच्या दुःखात सहभागी आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.