उदगीरः उदगीर येथे 23 आणि 24 एप्रिल दरम्यान होणाऱ्या 16 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे ( Vidrohi Marathi Sahitya Sammelan) उद्घाटन इस्लामच्या सहिष्णू परंपरेचे समर्थक, अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्गाहचे प्रमुख, सुफी (Sufi) परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुफी विचारवंत सरवर चिश्ती यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीचे विद्रोही विचारवंत डॉ. अशोककुमार पांडेय (Dr. Ashok Kumar Pandey), विद्रोही संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. आनंद पाटील, 14 व्या विद्रोही मराठी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. प्रल्हाद लुलेकर व चौथ्या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक डॉ. अजीज नदाफ हे उपस्थित राहणार आहेत. विद्रोही साहित्य संमेलनाची कार्यक्रमपत्रिका संमेलनाच्या स्वागताध्यक्षा डॉ. अंजुम कादरी आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी जाहीर केली. मराठीतील ज्येष्ठ कवी गणेश विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत आहे. या संमेलनाच्या पूर्वसंध्येला ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. 23 तारखेला सकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून विद्रोही साहित्य संस्कृती विचारयात्रेला लिंगायत चळवळीचे नेते चंद्रकांत वैजापूरे यांच्या हस्ते सुरुवात होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गोव्याचे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक दामोदर मावजो यांना बोलावण्यावरून वाद झाला होता. त्या पार्श्वभूमीवर विद्रोही साहित्य संमेलनात प्रभाकर ढगे व शैलेंद्र मेहता या गोवास्थित मराठी व कोकणी साहित्यिकांना आमंत्रित करण्यात आले आहे.
संमेलनाच्या उदघाटन समारंभात प्रसिद्ध पुरोगामी शेतकरी नेते रंगा राचुरे, तत्वज्ञ संपादक डॉ. नागोराव कुंभार, सामाजिक कार्यकर्ते रामराव गवळी व अंधश्रध्दा निर्मुलनाचे सत्यशोधक माधव बावगे या चार जणांचा विद्रोही जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. यावर्षी विद्रोही विलास सरवदे यांचे शिल्पप्रदर्शन, डॉ. सुनील अवचार, सुधारक ओलवे (चित्रकार ,मुंबई) यांचे कोरोना लॉकडाऊन आणि कष्टकरी हे चित्रप्रदर्शन, डॉ अनंत राउत (नांदेड) यांचे संविधान संस्कृती पोस्टर प्रदर्शन, गौतम निकम (जळगाव) यांचे खान्देशातील आंबेडकरी योध्दे हे छायाचित्र प्रदर्शन आणि अड अब्दुल्ला काद्री यांचे 1979 सालचे उदगीर इतिहासावरील ‘ऐतिहासिक उदगीर’ हे छायाचित्र प्रदर्शन वैशिष्ट्य असणार आहे.
विद्रोही साहित्य संमेलनात वैचारिक मेजवानी मिळणार आहे. साहित्य संस्कृती माध्यमे यावरील पाच परिसंवाद, विविध सामाजिक राजकीय विषयांवरील सोळा गट चर्चा आणि एका वादग्रस्त लेखकाची विशेष मुलाखत अशी वैचारीक देवाणघेवाणीची सुवर्णसंधी रसिकांना मिळणार आहे. शिवाय तीन एकपात्री प्रयोग, झुंड चित्रपटात रॅप सादर केलेल्या ‘रॅपटोली’ या आर्केस्ट्रा सादर करणाऱ्या तरुणांचे सादरीकरण,महानाट्य यशोधरा, शिवाजी अंडरग्राऊंड ही दोन नाटके, एक भारुड या सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल आहे.
उदगीर शहराला महात्मा बसवण्णांच्या लिंगायत चळवळीची पार्श्वभूमी आहे. विद्रोहीने विस्तीर्ण जिल्हा परिषद मैदानावर उभ्या संमेलननगरीला महात्मा बसवण्णा वचनसाहित्य नगरी हे नाव दिले आहे. या नगरीत फुले शाहू आंबेडकर विचारमंचावरून होणाऱ्या मंथनातील दुसरे सत्र ‘सनातनवाद आणि महात्मा बसवण्णांच्या वचनसाहित्यातील विद्रोह’ हे आहे. उस्तुरी मठाचे अधिपती व प्रख्यात प्रबोधक कोर्णेश्वर अप्पाजी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात नंदाताई (शरण कक्कय्या गुरुपीठ, कर्नाटक), राजू जुबरे (प्रख्यात भाषांतरकार हिरेमठ संस्थान भालकी), प्रा. भीमराव पाटील (लातूर) हे मान्यवर अभ्यासक विचार मांडतील. झुंड चित्रपटात गाजलेल्या विपिन तातड व सहकाऱ्यांची समाजप्रबोधनपर रॅपगीते सादर करतील.
पाचव्या सत्रात राजेंद्र कांबळे, एन. डी. राठोड, संजय घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले कवी संमेलन होईल. तर दुसरे निमंत्रीत कवी संमेलन विख्यात कवयत्री डॉ. प्रतिमा अहिरे, अंकुश सिंदगीकर व प्रा प्रशांत मोरे (मुंबई) या मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली होईल. या दोन्ही कवी संमेलनात महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील 90 नामवंत कवी सहभागी होणार आहेत. याशिवाय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभामंडपामध्ये रात्री 8 ते 11 नवोदित कवी संमेलन होईल. बहुभाषिक कवी आपल्या रचना सादर करतील.
संमेलनात मुख्य मंचावर बसवण्णा यांच्या वचनसाहित्यावरील परिसंवाद नंतर ‘सांस्कृतिक वर्चस्ववाद आणि बहुविधता’ या विषयावर प्रा. सुरेश शेळके, प्रभू राजगडकर (नागपूर), प्रशांत सोनोने (बुलढाणा), तालीब सोलापूरी (सोलापूर) या मान्यवरांचा डॉ. मारोती कसाब यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. त्यानंतर ‘महामानवांची बदनामी – इतिहासाचे विकृतीकरण’ या विषयावर संध्या नरेपवार, सरफराज अहमद, अभिनेते किरण माने, डॉ. श्रीमंत कोकाटे या इतिहास संशोधक अभ्यासकांचा इतिहासज्ञ अशोक राणा यांच्या अध्यक्षतेखाली होणारा परिसंवाद सध्याच्या ब. मो. पुरंदरे – राज ठाकरे वादावर काय भाष्य करतो याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
किल्लारी भुकंपग्रस्तांशी नाते सांगणारा नैसर्गिक व मानवी आपत्ती आणि मराठी साहित्य या विषयावर डॉ. वंदना महाजन, डॉ. श्रृती तांबे या विद्यापीठीय विद्वानांसह डॉ. अनिल जायभाये, डॉ. अशोक नारनवरे, ‘बिऱ्हाड’ कार अशोक पवार या तरुण अभ्यासकांचा डॉ. रामप्रसाद तौर (नांदेड) यांच्या अध्यक्षतेखाली होणारा परिसंवाद विद्रोहीच्या जीवनवादी व्यवहाराचे द्योतक ठरेल. ज्येष्ठ संपादक महावीर जोंधळे यांच्या अध्यक्षतेत ‘एकधिकारशाही आणि माध्यमांचे ऱ्हासपर्व’ या विषयावर डॉ राजेंद्र गोनारकर,अलका धूपकर, प्रभाकर ढगे,दत्ता कानवटे, नचिकेत कुलकर्णी इत्यादी विविध भागातील नामवंत पत्रकार, माध्यम तज्ज्ञ भाग घेणार आहेत.
सावरकरांचा पर्दाफाश, गांधी आणि नेहरू, कश्मिरी पंडीत- सत्य आणि विपर्यास या ग्रंथाचे लेखक वादग्रस्त विचारवंत डॉ. अशोककुमार पांडे (दिल्ली) यांची देवेश त्रिपाठी (मुंबई), डॉ. सुशीला पिंपळे- नारनवरे, डॉ. हंसराज भोसले, डॉ. भगवान वाघमारे, हे विशेष मुलाखत घेणार आहेत. ते ‘कश्मीर पंडीतांच्या प्रश्नाचे’ आंतरराष्ट्रीय अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांची मुलाखत ऐकण्यासाठी सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड, हैदराबाद परिसरातून लोक उपस्थित राहणार आहेत.
संमेलनात पुण्याच्या प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर यांचा गाजलेला एकपात्री प्रयोग यांचा मी सावित्री ज्योतीराव फुले बोलतेय सादर होईल. तर ‘द तुषार पुष्पदीप’ चे भारुड व परभणीचे सुनील ढवळे दिग्दर्शित विद्रोही कलाकार अभिनित ‘यशोधरा’ नाटक मुख्य मंचावरुन सादर होईल. तर दुपारनंतर अण्णाभाऊ साठे सभामंडप क्र. 2 येथे मुक्ता साळवे बालमंचावर, शहीद भगतसिंग युवामंचावर विविध कलाप्रकारांचे सादरीकरण होईल. तसेच ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरील परिक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ होईल.त्यासाठीची व बालमंच,युवा मंच यावर कार्यक्रम करण्यासाठी नाव नोंदणी 21 तारखे पर्यंत चालू आहे.
साहित्य संमलेनाचा समारोप सन्माननीय कवी विख्यात सिनेदिग्दर्शक ‘सैराट व झुंडकार’ नागराज मंजुळे यांच्या हस्ते समारोप आहे. यावेळी एन.डी. टी.व्ही. चे संपादक रविशकुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावतील. स्वागताध्यक्ष डॉ. अंजुम कादरी, संयोजक निवृत्ती सांगवे, नाटककार प्रकाश त्रिभूवन व विद्रोही सांस्कृतीक चळवळीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा समारोपाचा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले व संमेलनाचे संयोजक अहमद सरवर यांनी दिली.
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!