शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आज पुन्हा एकदा बारामतीतून लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर विजय शिवतारे यांनी हा निर्धार व्यक्त केला आहे. मात्र, वेळ पडल्यास आपण कमळ चिन्हावरही लढू असंही शिवतारे यांनी म्हटलं आहे. अपक्ष लढण्यापेक्षा कमळाच्या चिन्हावर लढणं चांगलं असंही शिवतारे यांनी म्हटलं आहे. शिवतारे यांनी बारामतीतून लढण्यासाठी नवा पर्याय ठेवल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मात्र डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा भेट घेतली. यावेळी त्यांनी बारामतीतील लोकांचा कल काय आहे याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना मोठी माहिती दिली. महायुतीच्या माध्यमातून ही सीट मिळाली आणि विजय शिवतारे उमेदवार असतील तर शंभर टक्के ही सीट धनुष्यबाणाच्या चिन्हावरही आपण जिंकू शकतो. बारामतीच्या मतदारांची तशी मानसिकता आहे, असा दावा विजय शिवतारे यांनी केला आहे.
कमळावरही लढेल
मी गेली 15-20 दिवस या मतदारसंघातून फिरत आहे. त्यामुळे माझा आत्मविश्वास आलाय. लोकांचा कल काय आहे? अंडरकरंट्स काय आहेत? हे मी सीएमला सांगितले. बेसिकली ही सीट गेल्या 10-20 वर्षापासून भाजपची होती. अगदी भाजपच्या चिन्हावर लढायची गरज पडली तरी माझी हरकत नाही. मी कमळावर लढायला तयार आहे. लोकांशी विचारमंथन करून मी या निर्णयाप्रत आलोय. अपक्ष लढणं हा नंतरचा भाग आहे. महायुतीत अशा पद्धतीने निर्णय झाला तर ते सोयीचं आहे, असं सांगतानाच इलेक्टीव्ह मेरिट हा निकष महायुतीत असला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
भाजपशी चर्चा कशी करणार?
एक एक खासदार महत्त्वाचा आहे. मोदींना पंतप्रधान बनवायचं आहे. मी नेत्यांना कमळावर लढण्याचा पर्याय दिला आहे. अपक्ष लढण्यापेक्षा ते चांगलं. मुख्यमंत्र्यांनी आता ही सीट महायुतीत मागून घ्यावी. या सीटबाबत भाजपच्या नेत्यांशी मी कशी चर्चा करू? माझे नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्याशीच मी चर्चा करेल. पण तशीच गरज पडली तर मी भाजपच्या नेत्यांशी बोलेल, असंही ते म्हणाले.
सुनेत्रा पवार निवडून येणार नाही
मी याआधी मुख्यमंत्र्यांना भेटलो. काल शंभूराजे देसाईंना भेटलो. त्यांनाही तीच विनंती केली की बारामतीची सीट महायुतीमध्ये आपल्यासाठी मागून घ्यावी. सुनेत्रा पवार कुठल्याही परिस्थितीत निवडून येणार नाहीत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना फायदा होईल. अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी आपले दुश्मन तयार केले आहेत. त्यामुळे कुठल्याही थराला जाऊन त्यांना मदत केली जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
मी खूप पुढे गेलोय
जनता म्हणते की बापू तुम्ही निवडणूक लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्यामुळे मी आता खूप पुढे गेलोय. आता माघार घेऊ शकत नाही. महायुतीचा माझ्यावरती दबाव आहे. अनेक नेते माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. पण माझ्यावरती बारामतीतल्या जनतेचा दबाव आहे आणि त्यामुळे आता माघार घेणं शक्य नाही. 2019 चा बदला म्हणून नाही तर बारामतीतल्या जनतेला असं वाटतं की पवारांव्यतिरिक्त आता पर्याय हवा. म्हणून मी निवडणूक लढणारच आहे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.