गजानन उमाटे, नागपूर : राहुल गांधी यांच्याकडून यापुढे सावरकरांबाबत (Savarkar) अपमानास्पद वक्तव्य येणार नाही, असं आश्वासन काँग्रेसने शिवसेनेला मिळालं. मात्र महाराष्ट्रातीलच काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या कन्येनं वीर सावरकरांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. उद्धव ठाकरेंनी सावरकरांवरील वक्तव्यावरून काँग्रेसला इशारा दिला होता. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याच्या चर्चाही सुरु झाल्या. मात्र काँग्रेसने सावरकरांचा मुद्दा वगळण्याचं आश्वासन दिलं. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असतानाच शिवानी वडेट्टीवार या विजय वडेट्टीवार यांच्या कन्येनं वादग्रस्त वक्तव्य केलंय. विशेष म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी आज या वक्तव्याचं समर्थन केलंय.शिवानी यांनी सावरकरांचं एक पुस्तक वाचून हे वक्तव्य केलंय. यावर तीच खुलासा करेल. भाजपने आरोप करण्यापूर्वी आधी संपूर्ण सावरकर वाचावा, असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलंय.
बलात्कार हे राजकीय हत्यार आहे, अशा विचारांचं सावरकरांनी समर्थन केलं, असा दावा शिवानी यांनी केलाय. हे लोक फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर कधीच मोर्चा काढणार नाहीत. तर सावरकरांवर मोर्चा काढतात. सावरकरांचे विचार होते, बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. हे तुम्ही आपल्या राजकीय विरोधकांविरोधात वापरलं पाहिजे. या विचारांचे ते समर्थन करतात. मग माझ्यासारख्या महिला भगिनींना कसं सेफ वाटेल, असा सवाल शिवानी वडेट्टीवार यांनी केलाय.
शिवानी वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी समर्थन केलंय. ते म्हणाले, ‘ मी शिवानीला विचारलं. ती म्हणाली, सावरकरांनी लिहिलेलं पुस्तक ‘सहा सोनेरी पानं..’ याचा रेफरन्स घेऊन ती बोलली. तसं असेल तर त्यात वाद होण्याचा विषय नाही. मत-मतांतरं असू शकतात. मला तो रेफरन्स माहिती नाही. ती वकील आहे. त्यामुळे तिला वाचनाचा छंद आहे.
नागपूरमध्ये बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘ आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. फुले, शाहू महाराज हे आमचे आदर्श आहेत. नाना पटोलेंनी समर्थन केलं असेल तर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. कोणी कुणाला मानाव,हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. कुणाचा अपमान करण्याचा उद्देश नाही.. भाजपच्या लोकांनी सगळं वाचावं. सावरकर यात्रा निघाली तेव्हा अनेकांना त्यांच्याबद्दल काही माहिती नव्हतं. काँग्रेसच्या काळात वि दा सावरकर असा धडा असायचा.
ते वाचत असताना आमच्या डोळ्यांसमोर त्यांची शक्तिशाली प्रतिमा उभी ठाकायची. परंत २०१४ पर्यंत आम्ही सावरकर वाचला आणि तो वीर सावरकर म्हणूनच मानलं. नेहरू आणि गांधींपेक्षा सावरकर मोठे आहेत, असं भासवण्याच्या नादात फूट पाडली गेली. सावरकर मोठे की गांधी मोठे, नेहरू मोठे.. असा वाद सुरु केला. तिथूनच सावरकर वाचायला सुरुवात झाली आणि हा वाद वाढत गेला. मतमतांतरात सावरकरांना टीकेचा धनी करण्याचं काम भाजपने केलंय. ज्यांचं देशासाठी योगदान आहे, त्यांना न मानण्याचं कारण नाही.
शिवानी वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर महाविकास आघाडीत यामुळे पुन्हा वाद वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात नागपुरात वज्रमूठ सभेचं आयोजन आहे. सभेच्या ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकतो, असंही म्हटलं जातंय. मात्र विजय वडेट्टीवार म्हणाले, तणाव निर्माण होण्यासारखी स्थिती नाही. तिने केलेल्या वक्तव्याचा खुलासा शिवानी करेल. हा फार गंभीर विषय नाही…