काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा भूकंपाचा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे बडे नेते आणि राज्यातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. तसा दावाच राज्याचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी केला आहे. अत्राम यांनी थेट बॉम्बच फोडल्याने एकच खळबळ उडाली आहे. वडेट्टीवार यांनी पक्षप्रवेशासाठी अनेक बैठका केल्याचा दावाही अत्राम यांच्याकडून करण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना हा गौप्यस्फो केला आहे. विजय वडेट्टीवार लवकरच भाजपमध्ये येणार आहेत. त्यांनी भाजप नेत्यांसोबत अनेक बैठका केल्या आहेत. या बैठकांचा मी साक्षीदार आहे. या चर्चा झाली मला माहीत आहे, असं धर्मराव बाबांनी म्हटल्याने खळबळ उडाली आहे.
मी आदिवासी माणूस खोटं बोलणार नाही
मी आदिवासी माणूस आहे. आदिवासी माणूस खोटा बोलणार नाही, विजय वडेट्टीवार हे अशोक चव्हाण याचे राईटहॅंड आहेत. आता चव्हाणच भाजपमध्ये आले आहेत. त्यानंतर नामदेव उसंडी, प्रकाश देवतळे भाजपात आले आहेत. त्यानंतर लवकरंच विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार भाजपात येणार आहेत. वडेट्टीवार भाजपात जाणार असल्याची चर्चा झालीय, असा दावाही अत्राम यांनी केलाय.
पैसे आहेत, पण बुद्धी नाही
विजय वडेट्टीवार यांनी धर्मराव बाबा अत्राम यांच्याकडे पैसे आहे, पण बुद्धी नाही, अशी टीका केली होती. या टीकेनंतर धर्मराव बाबा यांनी थेट बॉम्बच फोडला आहे. वडेट्टीवार भाजपात येणार असल्याचा दावाच त्यांनी केला आहे.
दहा जागा जिंकणार
राष्ट्रवादीकडून मी गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून लढावं, अशी पक्षाची इच्छा होती. पण मला तिकीट मिळालं नाही, जागा भाजपकडे गेलीय. महायुतीचा नेता म्हणून मी अशोक नेते यांच्यासाठी प्रचार करतोय. विदर्भात महायुती 10 जागा जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
मी कुठेही जाणार नाही
दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी धर्मराव बाबा अत्राम यांचा दावा खोडून काढला आहे. मी कुठेही जाणार नाही. मी काँग्रेसमध्येच आहे. धर्मरावबाबा खोटं बोलत आहेत. त्यांची नार्को टेस्ट करा. दूध का दूध अन् पानी का पानी होईल, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.