नागपूर: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवाजी पार्कवरील भाषणाचे राजकीय वर्तुळात चांगलेच पडसाद उमटले आहेत. खासकरून भाजपने (BJP) राज ठाकरे यांच्या भाषणाचे जोरदार स्वागत केले आहे. भाजपच्या मित्रं पक्षांनीही राज यांच्या भाषणाचं स्वागत केलं आहे. यात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेही मागे नाहीत. विनायक मेटे (Vinayak Mete) यांनीही राज यांच्या भाषणाचं स्वागत केलं आहे. गुढीपाडव्याला राज ठाकरे यांचं भाषण झालं ते पूर्णपणे आघाडी सरकारचे लक्तरे काढणारं आणि वस्तुस्थिती मांडणार होतं हे स्पष्ट दिसत होतं. काम करणाऱ्या माणसाला बाजूला ठेवण्याच काम काही लोकांनी जाणीवपूर्वक केलं आहे. राज ठाकरे यांनी एक शब्द वापरला. कोणासोबत पळून जातात आणि लग्न दुसऱ्या सोबत त्या ऐवजी मी असं म्हणेल लग्न एका सोबत केलं आणि संसार दुसऱ्या सोबत ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मात्र काही लोकांनी ही संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला आहे हे चांगलं नाही, अशी टीका विनायक मेटे यांनी केली आहे.
मनसेने गुढी पाडव्या निमित्त शिवाजी पार्कवर सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी राज ठाकरे यांनी जोरदार भाषण करत आघाडी सरकारवर टीका केली होती. शिवसेनेने भाजपसोबत युती केली. निवडणुका लढवल्या आणि निकालानंतर आपलं सरकार येत नाही हे लक्षात आल्यावर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला आठवला. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली. लग्न एकाबरोबर केलं आणि पळून कोणाबरोबर गेले हे कळलंच नाही, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला होता. त्यानंतर भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांचं समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.
राज ठाकरे यांच्या भाषणाचं मेटे यांनीही स्वागत केलं आहे. या आधी रिपाइं नेते रामदास आठवले यांनीही राज यांच्या भाषणाचं समर्थन केलं होतं. मुंबई, ठाणे आणि नाशिकसह इतर महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यातही मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेचा मोठा जनाधार आहे. भाजप आणि मनसेची युती झाल्यास या महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल वेगळा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर राज यांनी भाजपशी हात मिळवणी करावी म्हणूनच भाजपसह भाजपच्या मित्रं पक्षांनीही राज यांच्या भाषणाची स्तुती करण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं जात आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राज ठाकरे यांच्या भाषणाचं समर्थन केलं आहे. सामान्य हिंदूंच्या मनामध्ये आनंद निर्माण करणारं भाषण होतं. मी धर्मांध नाही पण धर्माभिमानी आहे हे त्यांचं वाक्य मला आवडलं. हिंदू या शब्दात सर्वधर्म समभाव आहे. हिंदू म्हणजे बुरसटलेला असं चित्रं निर्माण केलं गेलंय. कालच्या भाषणातून बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली. भाजपचा विश्वासघात झाला हे फक्त आम्ही एकटे म्हणत होतो. आता आणखीही कोणी म्हणतंय. जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी सगळं जे सांभाळायच आहे ते हिंदूनी अशी भावना झाली आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. राष्ट्रवादी बाबत राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याशी मी 200 टक्के सहमत आहे. राष्ट्रवादीच्या जातीयवादाची अनेक उदाहरण आहेत. प्रत्येक गोष्टीत जात आणणं हे काँग्रेसने केलं नाही. या उलट राष्ट्रवादी आहे, असं पाटील म्हणाले.
संबंधित बातम्या:
Video : बिबवेवाडीनंतर आता उंड्रीत बाऊन्सरकडून पालकांना धक्काबुक्की, युरो शाळा प्रशासनाची मुजोरी