नाशिक : शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या पक्षाचा नेता कोण यावरून दोन पदाधिकारी यांच्यात वाद सुरू झाला आहे. शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी शिवसंग्राम युवकचे प्रदेशाध्यक्ष उदय आहेर यांची हकालपट्टी केली होती. त्यामुळे संतापलेल्या उदय आहेर यांनी पदाधिकारी आपल्यासोबत असून मेळावा घेऊन भूमिका ठरवणार असल्याचे जाहीर केले आहे. उदय आहेर यांच्या सोबत तानाजी शिंदे यांच्यापेक्षा जास्त जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी असल्याने शिवसंग्राम संघटनेवर दावा करण्याच्या तयारीत आहे. मात्र, याच काळात विनायक मेटे यांच्यानंतर आश्वासक चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांचा चेहरा वाटतो, ते समाजाला न्याय देऊ शकतील असं मतही उदय आहेर यांनी मांडलं आहे. उदय आहेर हे नाशिकच्या देवळा तालुक्यातील असून विनायक मेटे यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, मेटे यांच्या निधनानंतर संघटनेत वाद होऊ लागल्याने आहेर यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहे.
शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर पक्षाचा नेता कोण यावरून उभा राहिलेला वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे.
शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे आणि युवक प्रदेशाध्यक्ष उदय आहेर यांच्यात वाद सुरू असून शिंदे एकटे पडल्याने आदळ-आपट करीत असल्याचा आरोप आहेर करत आहे.
उदय आहेर यांच्या सोबत 90 पदाधिकारी असल्याचा दावा त्यांनी केला असून पुढील आठवड्यात अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याचेही उदय आहेर यांनी म्हंटलं आहे.
उदय आहेर यांना विनायक मेटे यांच्यानंतर राज्यात आश्वासक चेहरा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाटत असल्याने बाळसाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करण्याची संकेत त्यांनी दिले आहे.
युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून उदय आहेर यांची हकालपट्टी करण्यात आल्याने शिवसंग्राममध्ये सध्या दोन गट पडले आहे, त्यामुळे येत्या काळात आहेर यांची भूमिका काय असणार याकडे शिवसंग्रामच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं लक्ष लागून आहे.