Tv9 चा दणका, जिल्हा परिषद शाळेत रिल्स काढणं तरुणांना महागात पडणार, मुख्यध्यापकांना खुलासा करण्याची सूचना

| Updated on: Jan 03, 2025 | 10:36 PM

टीव्ही 9 मराठीच्या या वृत्ताची दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनाही खुलासा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी लेखी खुलासा आल्यानंतर योग्य कारवाई देखील करणार असल्याचा इशारा दिला आहे.

Tv9 चा दणका, जिल्हा परिषद शाळेत रिल्स काढणं तरुणांना महागात पडणार, मुख्यध्यापकांना खुलासा करण्याची सूचना
Tv9 चा दणका, जिल्हा परिषद शाळेत रिल्स काढणं तरुणांना महागात पडणार, मुख्यध्यापकांना खुलासा करण्याची सूचना
Follow us on

एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या सुरक्षिततेसाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र स्थानिक पातळीवर याचं खरंच गांभीर्य आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय. याला कारण ठरलंय कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातल्या दर्याचे वडगाव गावामधल्या जिल्हा परिषदेतील शाळेत तयार केलेले एक रिल. वडगावमधील जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थ्यांनी सिंघम चित्रपटाच्या डायलॉगवर रिल तयार केलंय. या रिलमध्ये जिल्हा परिषदेच्या इमारतीसह टेबलचा वापर तर झालाच शिवाय खुर्चीला देखील लाथ मारल्याचं दिसतंय. या रिलवरून सध्या कोल्हापुरात संतापाची लाट आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ने पहिल्यांदाच हा व्हिडिओ समोर आणल्यानंतर आता संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया देखील सुरू झाली.

सध्या सोशल मीडियात असणारे रिल स्टार आपलं रिल वायरल करण्यासाठी कुठे काय करतील याचा नेम नाही. आता हेच बघा ‘सिंघम’ चित्रपटातील डायलॉग वापरून तयार केलेलं रिल चक्क एका जिल्हा परिषद शाळेतील आहे. त्यामध्ये शाळेच्या इमारतीचा वापर तर झालाच, शिवाय खुर्चीला लाथ देखील मारली आहे. हे सगळं घडले कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगावमधील प्राथमिक शाळेत. दिवसापूर्वी तयार केलेला हा व्हिडिओ आज सर्वात आधी ‘टीव्ही 9 मराठी’ने समोर आणला.

मुख्याध्यापकांनाही खुलासा करण्याच्या सूचना

शाळांच्या परिसरातील मुलांची सुरक्षितता लक्षात घेत राज्य सरकारने नुकताच जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी देखील केली आहे. एकीकडे सरकार या गोष्टी गांभीर्याने घेत असताना दुसरीकडे जिल्हा परिषद शाळेत व्हिडिओ शूट झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान tv9 मराठीच्या या वृत्ताची दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनाही खुलासा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी लेखी खुलासा आल्यानंतर योग्य कारवाई देखील करणार असल्याचा इशारा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यध्यापकांचा सावध पवित्रा

या सगळ्या प्रकरणात मुख्याध्यापक राजेंद्र जाधव यांनी मात्र सावध पवित्रा घेतलाय. काही दिवसांपूर्वी हे माझे विद्यार्थी माझ्याकडे आले होते आणि त्यांनी शाळेमध्ये फोटो काढण्याची परवानगी मागितली होती. फोटो काढायला तोंडी परवानगी दिली. मात्र रिल काढल्याचं चार दिवसांनंतर समजलं. यानंतर तात्काळ आपण संबंधितांना बोलावून समज देखील दिली होती, असं मुख्याध्यापक जाधव यांचं आता म्हणणं आहे.

शाळा व्यवस्थापन समितीची आक्रमक भूमिका

एकुणच शाळेच्या इमारतीमध्ये इतका गंभीर प्रकार होऊ नये, गाव पातळीवरच हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाल्याचा या प्रकारावरून दिसतंय. मात्र हा व्हिडिओ प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचताच आता मात्र शाळा व्यवस्थापन समितीने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. घडलेला प्रकार चुकीचाच असून व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन रिल करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेणार असल्याचं व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सविता बेनके यांनी सांगितलं आहे.

शाळा आणि शाळा परिसरातील मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही शिक्षकांवरच आहे. त्यासाठी सरकार कितीही प्रयत्न करत असले तरी शिक्षकांनी देखील याबाबत तितकंच गंभीर असणं गरजेचं आहे. मात्र प्रकरणात तसं दिसत नाही. शाळा सुरक्षेच्या शिक्षकच इतका बेजबाबदारपणा दाखवणार असतील तर दोष कोणाला द्यायचा? हाच प्रश्न आहे