महाराष्ट्र, मुंबई, प्रामुख्याने मराठी बोलणारी लोकं इथे राहतात. मात्र याच राज्यात, शहरातही मराठी बोलणाऱ्यांची अनेकदा गळचेपी होत असते. त्यातच आता नालासोपारा येथूनही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नालासोपारा येथे रेल्वेतील टीसीने दादागिरी केल्याचं उघड झालंय. रेल्वेमध्ये मराठी बोलणार नाही, अशी लेखी हमी मराठी दांपत्याकडून घेतल्याचा आरोप आहे. घडलेला हा प्रकार समजताच मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, रितेश मौर्या असं हिंदी भाषिक टीसीचं नाव आहे. नालासोपारा येथे या टीसीची दादागिरी पहायला मिळाली. टीसीच्या कार्यालयात मराठी दांपत्याला डांबून ठेवण्यात आलं.रेल्वेमध्ये मराठी बोलणार नाही असं मराठी दांपत्याकडून लिहून घेण्यात आलं असा आरोपही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ भलताच व्हायरला झाला आहे. या प्रकरणामुळे मोठा संताप व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं ?
वर नमूद केल्याप्रमाणे या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अमित पाटील असं त्या प्रवाशाचं नाव असून तो रविवारी रात्री 8.30 ते 9 च्या सुमारास पत्नीसोबत प्रवास करत होता. तेव्हा त्या स्टेशवर ड्युटीवर असलेले टीसी रमेश मौर्या यांनी त्याला तिकीट तपासणीसाठी थांबवलं, तिकीटाची विचारणा केली. मात्र पाटील यांना टीसीची भाषा समजली नाही. त्यांनी टीसीशी मराठीत संवाद साधला, त्याला मराठीत बोलण्यास सांगितलं. तेव्हा त्याने मुजोरी दाखवली. ‘ हम इंडियन है हिंदी मे बोलेंगे, रेल्वे मे मराठी नहीं चलेगा’, असे अरेरावीचे उत्तर टीसीने त्याला दिलं. त्यानंतर अमित आणि त्याच्या पत्नीला आरपीएफ कार्यालयात बसवून ठेवले तसेच मी मराठी भाषेचा आग्रह धरणार नाही, मराठी भाषेची मागणी करणार नाही असे पाटील दांपत्याकडून लेखी लिहून घेतले असा आरोप आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ अमित याच्या पत्नीने काढला, मात्र तिला ते व्हिडीओ देखील जबरदस्तीने डिलीट करायला लावला असाही आरोप आहे.
मराठी एकीकरण समिती आक्रमक
ही घटना वसई विरार मराठी एकीकरण समितीला समजताच ते आक्रमक झाले. नालासोपारा रेल्वेस्थानकात मराठी एकीकरण समितीने ठिय्या आंदोलन करून रेल्वे प्रशासनाला जाब विचारला.
त्या टीसीचे तात्पुरतं निलंबन
दरम्यान या प्रकरणाची रेल्वेने दखल घेतली आहे. मराठी दांपत्याला अशी वागणूक देणाऱ्या, मुजोरपणे वागणाऱ्या त्या टीसीचे वागणे उघडकीस आल्यावर मराठी एकीकरण समितीने उठावा केला. त्यानंतर तिकीट तपासनीस रितेश मोर्या याचे तात्पुरत्या स्वरूपात निलंबन करून, वरीष्ठ रेल्वे अधिकारी यांना रिपोर्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहे.