मुंबई | 16 जुलै 2023 : वंदेभारत एक्सप्रेस ( VandeBharat Express ) आता पर्यटनासाठी खास आकर्षण ठरली आहे. या ट्रेनने धार्मिक पर्यटनाबरोबर पावसाळी पर्यटनही घडत आहे. देशभरात आतापर्यंत 25 वंदेभारत ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. या वंदेभारत ट्रेनचे तिकीटदर जादा असले तरी त्या पर्यटनासाठी फायदेशीर ठरणार आहेत. यापूर्वी रेल्वेने निसर्गदर्शनासाठी मेल-एक्सप्रेसना पारदर्शक छताचे विस्टाडोम कोच ( Vistadom Coach ) बसवले होते. आता वंदेभारतमुळे अशा स्वतंत्र पारदर्शक छतांच्या डब्ब्याची गरजच नाही अशी स्थिती बनली आहे.
मुंबई सीएसएमटी ते सोलापूर मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 फेब्रुवारी 2023 पासून सुरु करण्यात आलेली देशातील नववी वंदेभारत ही बोरघाटातून जात असल्याने सह्याद्रीच्या घाटांचे पावसाळी पर्यटन घडत आहे. प्रवाशांना डोंगर रांगावरुन कोसळणारे धबधब्यांचे नयनरम्य मनोहारी दर्शन त्यामुळे घडत आहे. रेल्वे मंत्रालयाने तर धबधब्या जवळून जाणाऱ्या वंदेभारतचा व्हिडीओच ट्वीटरवर शेअर केला आहे.
हाच तो रेल्वे मंत्रालयाचा व्हिडीओ पाहा…
The scenic beauty of the cascading waterfall complements the #VandeBharatExpress crossing Bhor Ghat in Maharashtra. pic.twitter.com/6kJJ1KLQko
— Ministry of Railways (@RailMinIndia) July 14, 2023
मुंबई ते सोलापूर वंदेभारतला 16 डब्बे असून तिला दोन प्रकारच्या श्रेणींचे डबे बसविण्यात आले आहेत. एसी चेअरकार आणि एक्झुकेटिव्ह चेअर कार अशा त्या श्रेणी आहेत. ही ट्रेन मध्य रेल्वेमार्फत चालविली आणि मेन्टेनन्स केली जात आहे. बुधवार वगळून आठवड्याच्या सर्व दिवसात ही ट्रेन चालविली जाते.
वंदेभारत सेमी हायस्पीड ट्रेन व्हाया पुणे चालविली जात असून 4.55 किमीचे अंतर 06.35 तासांत ती कापते. या ट्रेनमुळे पारंपारिक ट्रेनपेक्षा दीड तासांची बचत होते. सीएसएमटीहून ती दु.4.05 वा. निघते आणि मुक्कामाला रात्री 10.40 वा. पोहचते. परतीच्या प्रवासात सोलापूरहून स. 06.05 वा. सुटते आणि सीएसएमटीला दु. 12.35 वा. पोहचते.
मुंबई ते सोलापूर एक्सप्रेसने सीएसएमटी ते सोलापूर या दोन शहरांची कनेक्टीव्हीटी वाढली आहे. सोलापूर मधील सिद्धेश्वर, अक्कोलकोट, तुळजापूर, सोलापूरजवळील पंढरपूर आणि पु्ण्याजवळील आळंदी अशा धार्मिक स्थळांना या ट्रेनमुळे प्रवाशांना जाता येणार आहे. या ट्रेनाला 115 टक्के भारमान मिळाले असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.
सीएसएमटी ते सोलापूर प्रवासात चार स्थानकांवरच थांबते. दादर, कल्याण जंक्शन, पुणे जंक्शन आणि कुर्डुवाडी असे मोजकेच थांबे तिला देण्यात आले आहे.