काँग्रेसच्या व्होट बँकेनेच उबाठा गटाला तारलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा दावा

| Updated on: Jun 20, 2024 | 8:36 AM

हरले तर ईव्हीएमचा घोटाळा आणि जिंकले तर ईव्हीएमचा काही दोष नाही. जर ईव्हीएमचा घोटाळा केला असता तर यामिनी जाधव आणि राहुल शेवाळेही जिंकले असते ना ? असा थेट सवालच यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला केला.

काँग्रेसच्या व्होट बँकेनेच उबाठा गटाला तारलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा दावा
CM Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray
Follow us on

शिवसेनेच्या 58 वा वर्धापन दिनानिमित्त शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा मेळावा वरळीतील डोम सभागृहात झाला. यावेळी लोकसभा निवडणूकीत शिवसेना उद्धव गटाचा कोकणात आणि ठाणे जिल्ह्यात पराभव केला आहे. उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या काही जागा केवळ त्यांना मिळालेल्या एकगठ्ठा मताने मिळाला असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे गटापेक्षा आमच्या स्ट्राईक रेट चांगला असून उद्धव ठाकरे गटाला कॉंग्रेसच्या व्होट बॅंकेने तारले असून ही व्होट बॅंक कायम सोबत राहील याची काहीही गॅरंटी नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी भाषणात ठाकरे गटाला ठणकावले.

शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन वरळीत साजरा झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. उबाठा हा खोटारडा पक्ष आहे. खोटं बोला आणि रडा… खरेतर यांचं नाव ‘रडेगट’ असं नाव त्यांना दिलं पाहिजे. सारखा ‘रडीचा डाव’ यांचा…आता जिंकलो.. जिंकलो..असा ढोल पिटतायत. पण कुणाच्या जीवावर ?, शिवसेनेचा मतदार तुमच्यासोबत राहिला का ? याचा आधी विचार करा अस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावले.  मुंबईत तुमच्या पेक्षा सव्वा दोन लाख जास्त मते आम्हाला मिळाली यावेळी असेही शिंदे यांनी आठवण करुन दिले. हरले तर ईव्हीएमचा घोटाळा आणि जिंकले तर ईव्हीएमचा दोष नाही. जर ईव्हीएमचा घोटाळा केला असता तर यामिनी जाधव आणि राहुल शेवाळेही जिंकले असते ना ? वायकरांचा विजय हा जनतेचा विजय आहे. तसेच मेरिटवर झालेला विजय आहे. रवींद्र वायकर यांच्या ठिकाणी जर ईव्हीएम हॅक होते, मग तुमचा विजय झाला ती ईव्हीएम चांगली का ? असा सवालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात  केला.

12 जागांवर हरले आणि जीत का जश्न ?

वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आपलाच आहे. त्यामुळे त्यांनी उबाठा ऐवजी दुसरं नाव ठेवलं पाहिजे. उठाबसा वगैरे…12 जागांवर हरलेली उबाठा जीत का जश्न मना रही है. गिरे तो भी टांग उपर. उबाठा काँग्रेसच्या वोट बँकेमुळे जिंकली आहे. हे दुधखुळं पोरगंही सांगेल. काँग्रेसच्या वोट बँकेने त्यांना तारलंय. शिवेसना प्रमुखांचा विचार सोडणारे हे लाचार आहे. काँग्रेसला गाडण्याची भाषा बाळासाहेब करायचे. या काँग्रेसने बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढला होता. याच काँग्रेसला मतदान करताना उबाठाचे हात थरथरले कसे नाहीत. काँग्रेसला मतदान करणारे बाळासाहेबांच्या विचाराचे वारस कसे होऊ शकतात असा सवालही यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला.