पालघर स्थानकाजवळ मालगाडी घसरून भीषण अपघात झाला आहे. या अपघाताला आता 15 तास उलटले असले तरीही वाहतूक अद्याप विस्कळीत आहे. याचा परिणाम लोकल सेवेवेर देखील झाला असून विरार ते डहाणू या मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. रुळांवर पडलेले मालगाडीचे डबे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र ते पूर्णपणे हटवेपर्यंत लोकल सवा तसेच लांब पल्ल्यांट्या गाड्यांचे वेळापत्रकही विस्कळीत असून अनेक गाड्यांना उशीर होत आहे.
काल रात्रीपासूनच पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू असलेला गोंधळ आज सकाळी देखील कायम असून त्यामुळे प्रवाशांचे मात्र मोठे हाल होत आहेत. कामावर निघालेले अनेक चाकरमानी, विद्यार्थी यांना मोठा फटका बसला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्याही १०-१२ तास उशिराने सुटत आहेत.
या मार्गावरून जाणाऱ्या मालगाडीचे काही डबे काल संध्याकाळी रुळांवरून घसरले आणि एकच गोंधळ निर्माण झाला. पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी पोहचत असताना क्रॉसिंगलाच मालगाडीचे पाहिले चाक ट्रक वरून खाली घसरले. सर्वात पाठीमागील चाक ट्रेकवरून खाली घसरले असताना याचा फटका समोरच्या चाकांना बसून, त्यावर लोड आल्याने मध्यभागाचे 7 डब्बे हे रुळावरून खाली घसरले. ऐन गर्दीच्या वेळेस वाहतूक ठप्प झाल्याने काल प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आणि सकाळीही वाहतूक अजून सुरळीत न झाल्याने लोकांना आणखीनच मनस्ताप सहन करावा लागतोय. वाढत्या गर्दीमुळेही लोकांना त्रास होत आहे.
Maharashtra | Dahanu Road-Panvel-Vasai Road, Vasai Road-Panvel-Vasai Road and Vasai Road-Panvel-Dahanu Road trains are fully cancelled after wagons of a goods train derailed at Palghar. The inconvenience caused is deeply regretted: Western Railway
— ANI (@ANI) May 29, 2024
प्रवाशांनी मांडल्या व्यथा
आम्ही सकाळी साडेसहापासून स्टेशनवर उभे आहोत. आत्तापर्यंत एकही गाडी आलेली नाही. आम्हाला कॉलेजमध्ये 80% हजेरी लावणे बंधनकारक आहे, ती नाही लागली तर आम्हाला परीक्षेला बसू देण्यात येणार नाही, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कॉलेजला गेलंच पाहीजे, असं एका विद्यार्थ्याने सांगितलं.
आम्ही काल डहाणूवरून सौराष्ट्र एक्स्प्रेस पकडली, पण ती बोईसरच्या आधीच मध्येच थांबवण्यात आली. तब्बल अर्धा तास गाडी तशीच थांबली होती, अखेर आम्ही खाली उतरून बोईसर स्टेशनपर्यंत चालायला सुरूवात केली. पण तिथे गेल्यावरही आम्हाला रिक्षा, बस काहीच मिळेना. शेवटी कसेबसे सेपरेट रिक्षा करून, जास्तीचे पैसे भरन घरी पोहोचलो. आज सकाळी पण लौकर आलोय पालघरला, किती वेळ उभे आहोत, पण एकही ट्रेन, मले, काहीच गेली नाही. सगळे ताटकळत आहेत, एखादी ट्रेन येईल असे म्हणत तर आहेत, पण त्याचीही निश्चित वेळ सांगता येत नाही. कामावर कसं जायचं असाच प्रश्न आहे, असा अनुभव आणखी एका प्रवाशाने सांगितला.