अकोल्यात पराभव… प्रकाश आंबेडकर यांनी फोडलं मुस्लिमांवर खापर; काय म्हणाले?

| Updated on: Jun 20, 2024 | 11:56 AM

ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे. अंतरवली सराटीच्या वेशीवरील वडीगोद्री गावात हे उपोषण सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या उपोषणकर्त्यांची आज भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर आंबेडकर यांनी या दोन्ही नेत्यांना पाणी पिण्याची विनंती केली. आंबेडकरांच्या विनंतीला मान देत या दोन्ही नेत्यांनी पणी घेतलं.

अकोल्यात पराभव... प्रकाश आंबेडकर यांनी फोडलं मुस्लिमांवर खापर; काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकर
Follow us on

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातील पराभवाचे खापर मुस्लिमांवर फोडलं आहे. माझा मतदार असलेला मुस्लिम समाज काँग्रेसकडे वळला. शंभर टक्के व्होट ट्रान्सफर झाली. त्यामुळेच माझा अकोल्यात पराभव झाला, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. मुस्लिमांनी यावेळी साथ दिली असती तर माझा विजय निश्चित झाला असता, असा दावाही प्रकाश आंबडेकर यांनी केला आहे. आंबेडकर यांच्या या दाव्यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

प्रकाश आंबेडकर हे वडीगोद्री येथे आले होते. वडीगोद्रीत ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या दोन्ही उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांना पाणी पिण्याचा आग्रह केला. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना आंबेडकर यांनी आपल्या पराभवाचं विश्लेषण करत मुस्लिम समाजावर खापर फोडलं. माझ्याकडचा मुस्लिम मतदार शंभर टक्के काँग्रेसकडे गेला आणि तो 100% काँग्रेसमध्ये गेल्यामुळे मी पडलो. मला ओबीसींची आणि मागासवर्गीयांची पावणेतीन लाख मते मिळाली. मुस्लिम समाजाची मतं माझ्याकडे आली असती तर मी जिंकलो असतो, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पाणी घ्या, उपोषण सुरू ठेवा

प्रकाश आंबेडकर यांनी आग्रह केल्यानंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी पाणी घेतलं. दिवसातून किमान एकवेळा तरी पाणी घ्या, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला. यावेळी त्यांनी दोन्ही नेत्यांना माजी पंतप्रधान व्हीपी सिंग यांचं उदाहरण दिलं. व्हीपी सिंग यांनी पाणी घेतलं नाही. त्यामुळे त्यांच्या किडनीवर त्याचा परिणाम झाला. म्हणूनच पाणी घ्या आणि उपोषण सुरू ठेवा, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आमच्या मताप्रमाणे व्याख्या करा

दरम्यान, लक्ष्मण हाके यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही प्रकाश आंबेडकर यांचा आदर करतो. म्हणूनच त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. मराठा समाजाला आरक्षण हवं आहे. त्यांना जर सग्यासोयऱ्यांची व्याख्या करायची असेल तर आरक्षणात अ, ब, क, ड ठेवा. आमच्या व्याख्येप्रमाणे सग्यासोयऱ्यांची व्याख्या केली नाही तर आम्हाला सरकारचा प्रस्ताव मान्य नाही. आमचा या आरक्षणाला विरोध असेल. आमच्यात कुणीही वाटेकरी नको. हवं तर त्यांना स्वतत्रं आरक्षण द्या. आमचं काही म्हणणं नाही, असं लक्ष्मण हाके म्हणाले.