वर्धा : हिंगणघाट तालुक्यात मागील तीन दिवसांपासून दमदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे यशोदा नदी (Yashoda River) दुथडी भरून वाहू लागली. नदीला पूर आला आहे. मनसावळी परिसरात पुराच्या पाण्यात बैलगाडीसह बैल वाहून गेल्याची घटना घडली. सुदैवाने ३ शेतकरी थोडक्यात बचावले. सिरसगाव येथील तीन शेतकरी शेतातून बैलगाडी घेऊन नदी पार करीत होते. मात्र, अचानक यशोदा नदीत अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. बैलगाडीसह बैलगाडीवर असलेले पांडुरंग कुभलकार (Pandurang Kubhalkar), आर्यन येसंबरे, विनायक उरकुडे (Vinayak Urkude) हे तिन्ही शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. अशात बैलगाडी नदीत उलटली. पुढील तीन-चार दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. वीज कोसळून होणाऱ्या आपत्तीपासून सुरक्षित राहण्यासाठी दामिनी अँप वापरावे, असे आवाहन वर्धा जिल्हा प्रशासनाने केले आहे.
यावेळी शेतकरी बैलगाडीच्या खाली पडले. बचावासाठी गाय व गोऱ्याची शेपटी पकडून तिन्ही शेतकऱ्यांनी कसाबसा आपला जीव वाचविला. मात्र, पुराच्या पाण्यात बैलगाडी व दोन बैल वाहून गेले. याप्रसंगी मनसावळी येथील वाल्मिकी दुरुगवार, अजय सुरजुसे, किसना साटोने, संजय सटोने या भोई समाजाच्या युवकांनी एका बैलाला जिवंत व एकाला मृतावस्थेत नदीबाहेर काढून बैलबंडीलाही काढले. सुदैवाने तिन्ही शेतकरी थोडक्यात बचावले.
पुराचा अंदाज न आल्यानं बैलबंडीवरील तिन्ही शेतकरी पुरात वाहून गेले. सोबत गाय व गोऱ्हा होता. एका शेतकऱ्यानं गायीच्या शेपटीला हात पकडला. दुसऱ्याने गोऱ्याच्या शेपटीला हात पकडला. हे हात पक्के धरून ठेवले. जनावर पोहून पुरातून बाहेर निघाले. त्यांच्या साह्याने तिन्ही शेतकरी बाहेर निघू शकले. जनवारे नसती तर वेगळं चित्र राहीलं असतं. या जनावरांमुळंच आपण वाचू शकल्याचं शेतकरी सांगतात. अन्यथा या पुरात पोहून बाहेर निघणे कठीण होते.
वर्धा जिल्ह्यात 14 जुलैपर्यंत हवामान अंदाजानुसार, पुढील तीन दिवस जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला. नागरिकांनी सतत पाऊस सुरु असताना बाहेर पडू नये. विजांचा कडकडाट होत असताना विशेष खबरदारी बाळगावी.