वर्धा – शासनाने एकल वापर प्लास्टिकची उत्पादने (Plastic products) वापरण्यास बंदी संबंधी अधिसूचना जाहिर केली आहे. त्यानुसार 1 जुलै 2022 पासून प्लास्टिक ग्लास, चमचे, वाट्या, सिगारेटच्या पॉकीटवरचे प्लास्टिक आवरण, मिठाईच्या डब्यावरचे आवरण, प्लास्टिकचे झेंडे, आईस्क्रिम कांड्या, प्लास्टिक स्ट्रा (Plastic straw) इत्यादी वस्तू उत्पादन, वापर व साठवणुकीस बंदी आहे. त्यामुळे अशा प्लास्टिकचा वापर आढळून आल्यास दंडात्मक कार्यवाही केली जाईल. प्लास्टिक बंदी (plastic ban) असली तरीही अनेक ठिकाणी त्याचे उल्लंघन होताना दिसते. मात्र प्लास्टिकबंदीचे उल्लंघन तुमचा खिसा पाच हजारांनी खाली करू शकतो. प्लास्टिकबंदीचे उल्लंघन केल्यास पाच हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. प्लास्टिक पिशव्या उत्पादने वापरणार्या व उत्पादित करणार्या संस्थांना दंड आकारण्यात येणार आहे. प्रथम दंड 5 हजार, दुसर्यांदा 10 हजार तर तिसर्यांदा प्लास्टिक आढळल्यास 25 हजार दंड आकारला जाईल किंवा संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील. त्यामुळे बंदी असलेल्या प्लास्टिकपासून चार हात दुरच राहिलेले बरे आहे.
प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याकरीता गठीत करण्यात आलेल्या जिल्ह्याकरिता कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी प्लास्टिक वापरावर कार्यवाही करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप-प्रादेशिक अधिकारी आनंद काटोले, प्रादेशिक अधिकारी अशोक करे, सर्व मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. एकल प्लास्टिक उत्पादने जसे प्लास्टिक ग्लास, चमचे, वाट्या, सिगारेटच्या पॉकीटवरचे प्लास्टिक आवरण, मिठाईच्या डब्यावरचे आवरण, प्लास्टिकचे झेंडे, आईसक्रीम कांड्या, प्लास्टिक स्ट्रा या वस्तु उत्पादन, वापर व साठवणुकीकरीता बंदी आहे. असे असले तरी बरेचदा अशा प्लास्टिकचा वापर होताना दिसतो. असा वापर होत असल्याचे दिसल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही केली जाणार आहे.
प्लास्टिकचे निर्मूलन करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर संबंधित यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. नगरपालिका क्षेत्रात व मोठ्या गावांमध्ये प्लास्टिकचा वापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शहरी भागात प्लास्टिक असेल तर ते एकत्र करून नगर पालिकेच्या कचरा गाडीमध्ये टाकावे, असे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी यावेळी सांगितले. कापडी व कागदी पिशव्यांचा वापर पर्याय म्हणून करावा.
नागरिकांनी सुध्दा साहित्य, वस्तू खरेदी करताना दुकानदारांना प्लास्टिक पिशव्यांचा आग्रह धरू नये, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले.