वर्धा : सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने प्रत्येक पक्षाचे कार्यकर्तेही जोरात कामाला लागले आहेत. अशातच आष्टी तालुक्यातील तळेगाव येथे ग्रामपंचायतच्या आरओ वॉटर प्लांट(RO Water Plant)वरून भाजपा-काँग्रेस(BJP Congress)च्या कार्यकर्त्यामध्ये हाणामारी झाली. बुधवारी झालेल्या या हाणामारीचा आज सर्वत्र व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
अपघाताचा धोका
तळेगाव येथील ग्रामपंचाय(Talegaon Grampanchayat)कडून आरओ वॉटर प्लांटकरिता उड्डाणपूल चौकातील जागा निवडण्यात आली. ती जागा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत नसतानाही या जागेवर आरओ प्लांट उभारल्यास अपघाताचा धोका संभावतो, तसेच तेथील व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे व्यावसायिकांनी यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारी केल्यात आहेत. अपघातांचे प्रमाण आधीच वाढले आहे. त्यात या जागेवर वॉटर प्लांट उभारला तर येथील अपघातांची संख्या अधिक होईल. त्यामुळे व्यावसायिक याला विरोध करीत आहेत.
अधिकाऱ्यांनी केली जागेची मोजणी
या अनुषंगाने महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी मोक्यावर जाऊन जागेची मोजणी केली. ही मोजणी सुरू असतानाच व्यावसायिक तथा काँग्रेस कार्यकर्ते प्रमोद चोहतकर आणि भाजपाचे जिल्हा सचिव सचिन होले यांच्यामध्ये वादावादी होऊन हातापाई सुरू झाली. त्याचे चित्रीकरण झाल्याने सध्या तळेगावात राजकीय वातावरण तापलेले आहे.