वर्धा : वर्ध्यातील सावंगी (Sawangi) मार्गावर भीमनगर परिसरात आंबेडकर शाळेजवळ (School) रस्त्याच्या कडेला विजयसिंग बघेल यांचे कृष्णा पाणीपुरी भेळ सेंटर आहे. याठिकाणी शुक्रवारी रात्री अतुल घोरपडे, त्यांची पत्नी प्रतीक्षा घोरपडे हे दाम्पत्य पाणीपुरी खाण्यासाठी थांबले. दोघेही कारमध्येच बसून पाणीपुरीचा आस्वाद घेत होते. तसेच सुनील भगत (Sunil Bhagat), त्यांची पत्नी मनीषा भगत आणि मुलगा सक्षम भगत हे तिघे रस्त्याकडेला उभे राहून पाणीपुरी खात होते. यावेळी अचानक राजू चंपत पाटील (वय 27) रा. समतानगर याने त्याच्या ताब्यातील कार बेदारकपणे व निष्काळजीपणे चालवली. पाणीपुरीच्या दुकानाजवळ असलेल्या कारला मागाहून जबर धडक दिली. कारने रस्त्याकडेला फुटपाथवर असलेल्या पाणीपुरीच्या हातगाडीला दूर अंतरावर फरफटत नेलं. तसंच पाणीपुरी खात असलेल्यांना चिरडलं. थरारक अपघातानंतर भरधाव कार रस्त्याच्या कडेला जावून पलटी झाली.
अपघातात अतुल घोरपडे यांचा सावंगी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांची पत्नी प्रतीक्षा यांची प्रकृती गंभीर आहे. पाणीपुरी विक्रेता विजयसिंग बघेल हा बेशुद्ध असून उपचार सुरू आहेत. मनीषा भगत, त्यांचा मुलगा सक्षम भगत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं उपचार सुरु आहेत. सुनील भगत किरकोळ जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. रात्रीच्या वेळी वर्ध्यातील भीमनगर परिसरात सावंगी मार्गावर रस्त्याच्या कडेला काही जण पाणीपुरीचा आस्वाद घेत होते. अचानक अनियंत्रीत प्रथम उभ्या असलेल्या कारवर आदळली. त्यानंतर पाणीपुरी खाणार्यांना धडक देत हातगाडीलाही उडविलं. या विचीत्र अपघातात एक जण ठार तर पाच जण गंभीररीत्या जखमी झालेत.
या अपघातानंतर काही वेळ सर्वत्र शांतता पसरली. पाणीपुरीचा आस्वाद घेणारे जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडून होते. हे दृष्य पाहून काळजाचा जणू ठोकाच चुकला. अपघाताची माहिती मिळताच शहर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चमूसह अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात पाठविले. आरोपी कारचालक राजू चंपत पाटील रा. समतानगर याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.