वर्धा : ब्लू डॉट कंपनीच्या चेन्नई वेअर हाऊसमधून गुडगाव (Gurgaon) येथे लॅपटॉप पोहचविण्यासाठी निघाले. ट्रॅकमधील लॅपटॉप ट्रक चालकासह क्लीनरने (Drivers & Cleaners) परस्पर विकले. ही धक्कादायक घटना वर्धेच्या दरोडा टोल नाका (Daroda Toll Naka) परिसरात घडलीय. ट्रक चालक आणि क्लिनरने तब्बल 5 कोटी 43 लाख 2 हजार 518 रुपये किंमतीचे 1 हजार 418 लॅपटॉपची परस्पर विल्हेवाट लावून अफरातफर केलीय. प्रकरणी वडनेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी चालक आणि क्लिनरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोमीन महमूद खान रा. हमतगाम गुडगाव, रॉबीन नबाब खान रा. धुलावड तावडू गुडगाव रा. हरियाणा यांनी 16 मे 2022 रोजी ब्लू डॉट कंपनीच्या चेन्नई वेअर हाऊसमधून गुडगाव येथे लॅपटॉप पोहचविण्यासाठी जाणार होते.
मोमीन व रॉबीन यांना कंपनीच्या व्यवस्थापकाने विश्वासाने 3 हजार 824 लॅपटॉप सुपूर्द केले. मात्र, चालक आणि क्लिनर यांनी कंपनीचा विश्वासघात केला. वर्धा जिल्ह्याच्या दरोडा टोलनाका परिसरात वाहन उभे करुन 3 हजार 824 लॅपटॉप पैकी 5 कोटी 43 लाख 2 हजार 518 रुपये किंमतीचे 1 हजार 418 लॅपटॉपची परस्पररित्या विक्री केली. याप्रकरणी अशफाक मुस्तफा खान रा. कळमना जि. नागपूर यांनी वडनेर पोलिसात तक्रार दाखल केली.
वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास सुरु केला आहे. आरोपीच्या शोधात पथक रवाना करण्यात आले आहे. एका पोलीस उपनिरीक्षकसह तीन कर्मचारी दिल्ली येथील गुडगाव येथे रवाना झाले आहे. अफरातफर झालेल्या मालाची रिकव्हरी करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.