वर्धा : रमाई घरकुल योजनेचा (Ramai Gharkul Yojana) प्रस्ताव पंचायत समितीत पाठविण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागण्यात आली. या प्रकरणी लाच घेताना झाडगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक (Gram Sevak of Zadgaon Gram Panchayat) आणि ग्रामपंचायतीचे सदस्य यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली. ही कारवाई सोमवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली. झाडगाव येथील एका व्यक्तीला रमाई घरकुल योजनेंतर्गत घरकुल मिळवून देण्यासाठी ग्रामसेवक सचिन भास्कर वैद्य आणि ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र वामन संदूरकर यांनी गावातीलच एका लाभार्थ्याला 15 हजार रुपयांची मागणी केली होती. बौद्ध समाज बांधवांना घरकुल योजना मिळण्यासाठीचा प्रस्ताव वर्धा पंचायत समितीकडे (Wardha Panchayat Samiti) पाठविण्यासाठी ही डील करण्यात आली होती.
लाभार्थ्याने हा प्रस्ताव मान्य करीत 15 मार्च रोजी 15 हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार 21 रोजी पैसे देण्याचे ठरले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलिसांनी सापळा रचून ग्रामसेवक सचिन वैद्य आणि सदस्य नरेंद्र संदूरकर यांना लाचेची 15 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक केली. ग्रामीण भागात अशिक्षित माणसांशी अशाप्रकारची फसवणूक केली जाते. या सरकारी योजना आहेत. लोकांना त्यांचा लाभ मिळतो. पण, काही ग्रामसेवक त्यांच्याकडूनही पैसे वसुलीचं काम करतात. अशा ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. अडाणीपणाचा चांगलाच फायदा हे घेत असतात. विशेष म्हणजे सामान्य माणसं इथपर्यंत जात नाही. त्यांची पहिलीच वेळ असते. त्यामुळं त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जातो.