वर्धा : बनावट सोनं देऊन 20 हजारांची रक्कम घेत ऑटोचालकाची फसवणूक (Auto Driver Fraud) करण्यात आली. ही घटना दाभा परिसरात असलेल्या रेल्वे रुळानजीक घडली. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी (Hinganghat Police) दोन आरोपींना बेड्या ठोकल्या. धनराज भोसले आणि चारू फिरोज पठाण असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वर्धा जिल्ह्यातील म्हसाळा (Mhasala in Wardha District) येथील संत ज्ञानेश्वर नगरात प्रशांत मनोहर उमाटे राहतो. हा ऑटोचालक आहे. त्याच्या ऑटोत दोन्ही आरोपी प्रवास करीत होते. दरम्यान दोघांनी आमच्याकडे सोनं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, असे म्हणत मोबाईल क्रमांक घेतला. त्यानुसार प्रशांत यांच्या मोबाइलवर धनराजचा फोन आला आणि सोनं पाहिजे असल्यास दाभा परिसरात असलेल्या रेल्वे रुळाजवळ या असे म्हणाला.
प्रशांत उमाटे हे तेथे गेले असता आरोपी धनराज भोसले आणि चारू फिरोज पठाण हे दोघे त्यांना भेटले. त्यांनी प्रशांतला खरं सोनं आहे, असे भासवून 20 हजारांची रक्कम घेऊन बनावट सोनं देत फसवणूक केली. ही बाब प्रशांत उमाटे याच्या लक्षात येताच आपली फसवणूक झाल्याचे त्याला समजले. त्याने याबाबतची तक्रार हिंगणघाट पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ तपासचक्र फिरवून दोन्ही आरोपींना हिंगणघाट येथील रेल्वे फाटक परिसरातून अटक केली.
काही लोकं एखादी वस्तू स्वस्तात मिळते म्हणून लोभात पडतात. या लोभापायी त्यांचं नुकसान होतं. अशीच ही घटना वर्ध्यात घडली. वीस हजारांत सोनं मिळालं म्हणून ऑटोचालकानं ते खरेदी केलं. नंतर पाहतो तर काय ते सोनचं बनावट निघालं. शेवटी त्याला पोलिसांत धाव घ्यावी लागली. आरोपी पकडले गेले. पण, त्याला झालेला मनस्ताप कसा परत मिळणार. म्हणून एखादी वस्तू स्वस्तात मिळते म्हणून लोभात पडू नका. अन्यथा तुमचं नुकसान झालंच म्हणून समजा.