वर्धा : शहरालगतच्या सावंगी (मेघे) (Sawangi) परिसरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या आदित्य रेसिडेन्सीमधील (Residency) एका बंद फ्लॅटमध्ये आग लागल्याने चांगलीच खळबळ उडाली. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. लागलीच वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविले. यामध्ये फ्लटमधील साहित्य जळाल्याने अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविली जात आहे. सांवगी येथील आदित्य रेसिडेन्सीमधील पहिल्या माळ्यावरील 105 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये मंगेश ढवळे (Mangesh Dhawale) हे किरायाने राहतात. ते पुलगाव येथील मुळ रहिवासी आहे. भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले आहे. सध्या यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
वर्ध्यातील सावंगी परिसरातील आदित्य रेसिडन्सीला आग लागली. या आगीत फ्लॅट जळून खाक झाले. फ्लॅट स्कीम काळवंडली. देवालयातील दिव्यामुळं आग लागली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरुवारी सकाळी ते परिवारासह पुलगाव या मुळगावी गेले होते. त्यामुळे फ्लॅट बंद असताना दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटमधून धुराचे लोळ बाहेर येतांना दिसले. त्यामुळे नागरिकांनी तातडीने सावंगी पोलीस आणि वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
फ्लॅट बंद असल्याने मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला तर धुराचे लोळ अंगावर येत होते. तसेच सर्व फ्लॅटचा विद्युत पुरवठा बंद केल्याने कर्मचा-यांना आग विझविताना तारेवरची कसरत करावी लागली. या आगीमध्ये बेडरुमधील साहित्य, पुस्तक यासह इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू जळाल्याने जवळपास अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या आगीमुळे आतून पूर्ण फ्लॅट काळवंडला. ढवळे परिवार सकाळी देवालयात दिवा लावून घराबाहेर पडले. त्यामुळेच आगीचा भडका उडाला असावा, असा अंदाज घटनास्थळी उपस्थितांनी व्यक्त केला.