वर्धा : मागील काही दिवसापासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे वर्धा नदीच्या (Wardha river) पाणी पातळीत वाढ होत आहे. सोबतच निम्न वर्धा प्रकल्पातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. यामुळे पुलगाव येथील बुरड मोहल्ला (Burad Mohalla) परिसरात वर्धा नदीचे पाणी शिरले आहे. परिसरातील अनेक घरे पाण्याखाली आली असुन पाण्याच्या पातळीत सतत वाढत होत आहे.यामुळे तातडीने या नागरीकांना सुरक्षीत स्थळी (safe place) तातडीने स्थानांतरीत करुन त्यांच्या राहण्या व जेवणाची व्यवस्था करण्यात यावी. सोबतच ज्या नागरीकांची घरे पाण्याखाली आलो आहे त्यांचे पंचनामे करून खावटी योजना व इतर मदत करण्यात यावी.असे निर्देश आमदार रणजित कांबळे यांनी प्रशासनाला लेखी पत्रद्वारे दिले आहे.
परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने तेथील नागरिकांना नगरपालिकेच्या शाळेत प्रशासनाने स्थानानंतरीत केले आहे.देवळीचे तहसीलदार राजेश सरवदे,नप मुख्याधिकारी सतीश शेवदे, नायब तहसीलदार अजय झिले यांनी परिसराची पाहणी केलीय.सोबतच प्रशासनाकडून नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असून पूर ओसरायला सुरवात झाली आहे. धरणातूनही पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. मात्र आलेल्या या पुरामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या पुरामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांचे खरिपाचे पीक पूर्ण नष्ट झाले आहे यामुळे आता शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
अप्पर वर्धा आणि लोअर वर्धा धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हयातील वणी तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीला पूर स्थिती निर्माण झाली आहे. उकनी गावात पाणी शिरले असून काही घरात सुद्धा पाणी गेल्याची माहिती आहे. त्यामुळे गावातील संपूर्ण रस्ते जलमय झाले. नागरिकांनी 2 ते 3 फूट पाण्यातून चालत जाऊन मार्ग काढावा लागत आहे. जनावरांच्या गोठ्यात पाणी असल्याने चारा सुद्धा नष्ट झाला. एका महिन्यात दुसऱ्यांदा या गावाला पुराच्या पाण्याचा तडाखा सहन करावा लागला. या भागातील शेतात ही मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने पिकांचेही नुकसान झाले.