वर्धा : मागील एका आठवड्यापासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे देवळी मतदारसंघातील देवळी (Deoli), वर्धा, हिंगणघाट (Hinganghat) या तालुक्याच्या विविध भागात अतिवृष्टीपेक्षाही जास्त पाऊस झाला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी शेतात साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. पाण्याच्या प्रवाहाने, नदी नाल्याच्या पुराने शेती (Agriculture) अक्षरश: खरडून निघाली आहे. अनेक गावांतील नागरिकांच्या घरातसुद्धा पाणी शिरले. त्यामुळेही मोठे नुकसान झाले आहे. काही गावांना पुराने वेढा घातला आहे. नैसर्गिक आपत्तीत जीवीतहानीही झाली आहे. काही शेतकर्यांच्या बैलजोडी, जनावरे, शेती उपयोगी साहित्यही पाण्यात वाहून गेले.
नुकसान शेतकर्यांसह सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारे ठरत आहे. काही गावात पुराचे पाणी घरामध्ये गेल्याने अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात नासधुस झाली आहे. नागरिकांना तातडीने राशन पुरविणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी कच्च्या घरांचेही नुकसान होत आहे. या बाबींचा विचार करुन शेतकर्यांचे झालेले पिकांचे नुकसान, खरडून निघालेली जमीन, घरात पाणी शिरल्याने झालेले नुकसान, वीज पडल्याने व पुराच्या पाण्यात वाहून गेलेले तसेच जनावरांच्या झालेल्या नुकसानीचा स्थानिक अधिकार्यांच्या हस्ते पंचनामा करत तातडीने उपाययोजना कराव्या. केलेल्या पंचनाम्याचा आणि उपाययोजनांचा अहवाल सादर करावा, असे निर्देश आमदार रणजित कांबळे यांनी दिले आहेत.
नदीकाठच्या काही गावामध्ये पाणीपुरवठा योजनाही पुराच्या वेढ्यात सापडल्या आहेत. पूर ओसरल्यावर तेथे मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असतो. यामुळे नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होऊन नागरिकांच्या आरोग्यावर परिणामाची शक्यता आहे. ज्या गावामध्ये जलशुद्धीकरण केंद्र नाही, अशा गावांना गरज असल्यास टँकरने पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी, असेही निर्देश आमदार कांबळे यांनी दिलेत. पावसामुळे पूर येऊन अनेक ठिकाणी रस्ते, पुलांची दुरवस्था झाली आहे. अनेक गावांतील रस्ते, पूल खचल्याची माहिती मिळाली आहे. या नुकसानीचे पंचनामे करत अहवाल तयार करावा. नुकसान झालेल्या भागात पर्यायी उपाययोजना करत नागरिकांना दिलासा द्यावा. कारवाईचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही आमदार कांबळे यांनी दिले आहेत.
ज्या गावांमध्ये कच्चे घर आहेत. अशा घरांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते. संततधारमुळे कच्च घरात पाणी मोठ्या प्रमाणात रिचते . जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा ही कच्ची घरे पडत नसून काही दिवसांनी क्षतीग्रस्त होतात. त्यामुळे अश्या घरांना सुद्धा मदतीत समाविष्ट करत याबाबीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याच्या सूचना आमदार रणजित कांबळे यांनी पत्रातून दिल्या.