वर्धा : हिंगणघाट तालुक्याच्या बोपापूर येथील शेतकरी मनोहर रामचंद्र झाडे. झाडे यांनी बोपापूर शिवारातील (Bopapur Shivar) सहा एकर शेतीत ओलितासाठी बोअरवेल खोदली व कृषिपंपासाठी (Krishi Pump) वीजजोडणीकरिता जून 2020 ला डिमांड रक्कम 6 हजार 807 रुपये वीज वितरण कंपनीकडं भरली. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटूनही त्यांच्या शेतात वीज जोडणी दिली नाही. अख्ख शेत कोरडवाहू असताना महावितरणनं न वापरलेल्या विजेचं त्यांना तब्बल 20 हजार 180 रुपयांचं देयक पाठविलं. महावितरण कंपनीच्या या गलथान कारभाराचा शेतकऱ्याला चांगला धक्काच बसला. ना वीज जोडणी ना मीटर तरीही 20 हजार 180 रुपयांचे विजबिल कसं आलं, असा प्रश्न शेतकरी मनोहर झाडे यांना पडला आहे. झाडे यांनी हिंगणघाट महावितरण (Hinganghat MSEDCL) कार्यालायाला लेखी अर्ज दिलं. चौकशी करण्याकरिता विनंती अर्ज सादर केला. परंतु, त्यास केराची टोपली दाखविण्यात आली.
वीज वितरणच्या तक्रार निवारण केंद्रात तक्रार नोंदविली. तक्रारीला प्रत्युत्तर देत मोक्का चौकशी करू, असे म्हटलं, परंतु, अजूनपर्यंत मोक्का चौकशी झाली नाही. अशी माहिती धनंजय मनोहर झाडे यानं दिली. मनोहर झाडे यांनी वडनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून दाद मागितली. वडनेरचे ठाणेदार शेटे यांनी याप्रकरणाची दखल घेत मीटर लावायला गेलेल्या आऊट सोर्सिंग टेक्निशियन टिंकू सिंग यांना विचारणा केल्यानंतर कनिष्ठ अभियंता लसने यांनी मीटर लावण्यास सांगितल्याचे ते म्हणाले.
दुसऱ्या दिवशी कनिष्ठ अभियंता लसने यांना पोलिस ठाण्यात बोलावले असत उडवाउडवीची उत्तरे देऊन काढत पाय घेतला. त्यानंतर शेतात जाऊन मीटर बसविले आणि बरेच दिवसांपासून बसविल्याचे भासवून मीटर फोडल्याचा आरोप करत न्याय देण्याची मागणी पीडित शेतकरी मनोहर झाडे यांनी केली आहे. शेतकऱ्याने माहिती अधिकारात अर्ज केला असता 1 एप्रिल 2022 रोजी चार कर्मचा-यांनी सायंकाळी 5.30 ला शेतामध्ये जाऊन मीटर बसविले. फोटो काढले आणि मीटर काढून नेल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्याला न्याय मिळण्याची प्रतीक्षा आहे.