काँग्रेसने देशाचं नुकसान केले. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी न देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी हे विदर्भातील वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर चांगलेच तोंडसूख घेतले. उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी निशाणा साधला. त्यांनी काँग्रेससोबतच मित्रपक्षांना पण चांगलेच सुनावले.
त्यांना पुन्हा संधी देऊ नका
आम्ही अनेक निर्णय घेतले. पण मध्ये एक सरकार आलं आणि त्यांनी सर्व थांबवलं. ज्या काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या मित्रांनी शेतकऱ्यांना बर्बाद केलं. त्यांना परत संधी द्यायची नाही. काँग्रेसचा एकच हेतू आहे, खोटं, फसवणूक आणि बेईमानी आहे. काँग्रेसने तेलंगणात कर्जमाफीची घोषणा केली. त्यांचं सरकार आलं. पण त्यांनी कर्जमाफ केलं नाही. महाराष्ट्रात आपल्याला त्यांच्या धोकेबाजीपासून सावध राहिलं पाहिजे. आज जी काँग्रेस आहे, ती गांधींची नाही. आजच्या कांग्रेसमध्ये देशभक्तीची आत्मा मेली आहे. आजच्या काँग्रेसमध्ये द्वेषाचं भूत आहे.
आज काँग्रेसच्य़ा लोकांची भाषा पाहा. परदेशात जाऊन त्यांचे देशविरोधी अजेंडे सुरू आहेत. समाजाला तोडणं, देशात फूट पाडण्यावर बोलत असतात. तुकडे तुकडे गँग आणि अर्बन नक्षली लोक काँग्रेस चालवत आहे. देशातील सर्वात भ्रष्ट आणि बेईमान पार्टी काँग्रेस आहे. देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब हे काँग्रेसचं शाही कुटुंब आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
कर्नाटकात काँग्रेसने गणपतीला तुरुंगात टाकलं
ज्या पार्टीत आपल्या आस्था असेल ती पार्टी गणपती पूजेचा विरोध करणार नाही. पण आजच्या काँग्रेसचा गणपती पूजेला विरोध आहे. लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वात गणेशोत्सव सुरू झाला. सर्व धर्मीय एकसाथ येत होते. काँग्रेसला गणपती पूजेचीही चीड आहे. मी गणेश पूजेला गेलो तर काँग्रेसचं तुष्टीकरण सुरू झालं. काँग्रेसने गणपती पूजेला विरोध केला. तुष्टीकरणासाठी काँग्रेस काहीही करत आहे. कर्नाटकात काँग्रेसने गणपतीला तुरुंगात टाकलं.
नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा
गणपतीची लोक पूजा करत होते. ती मूर्ती पोलीस व्हॅनमध्ये ठेवलं होतं. महाराष्ट्र गणपतीची पूजा करत होता आणि कर्नाटकात गणपतीची मूर्ती पोलीस व्हॅनमध्ये होती. देशाला धक्का बसला आहे. काँग्रेसचे सहकारीही चूप आहे, असा चिमटा त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता काढला. त्यांना काँग्रेसचा रंग चढलाय. गणपतीचा अपमान करणाऱ्या कांग्रेसला सवाल विचारण्याची हिंमत त्यांच्यात राहिली नाही. काँग्रेसच्या या पापाचा बदला घ्यायचा आहे. आपल्याला विकास करायचा आहे. आपल्या साोबत राहून महाराष्ट्राची अस्मिता वाचवू. आपण मिळून महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करूयात, असे ते म्हणाले.