वर्धा : आरोग्य विभागासह विविध परीक्षांच्या पेपरफुटी घोटाळ्यात अटक झालेला डॉ. प्रीतीश देशमुख हा वर्ध्याचा रहिवासी असून त्याच्याशी संबंधित विविध चर्चांना उधाण आले आहे. डॉ. प्रीतीश देशमुख याने वर्धेतही मोठी माया गोळी केल्याची चर्चा आहे. एवढंच नव्हे तर त्याला राजकारणात मोठी रुची असल्याचीही बातमी समोर येत आहे. मुंबईवारीवर असलेल्या वर्धेच्या नेत्यांना त्याने विधानपरिषद आमदार बनन्याची इच्छा असल्याचही बोलून दाखवली असल्याचीही माहिती पुढे येत आहे.
डॉ. प्रीतीश दिलीप देशमुख याचे वर्धा शहरातील सेवाग्राम मार्गावरील स्नेहलनगर भागात घर आहे. त्याचे वडील वर्धा शहरालगतच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात गणित विषयाचे प्राध्यापक होते. अत्यंत हुशार व प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. ते अलीकडेच सेवानिवृत्त झाले होते. मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील असलेले हे देशमुख कुटुंब वर्ध्यात नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाले.
डॉ. प्रीतीश दिलीप देशमुख याचे स्नेहलनगर परिसरात मोठे आलिशान ‘राजवाडा’ नामक निवासस्थान आहे. त्याने घरासमोरील एका लेआऊटमध्ये तब्बल 8 हजार स्क्वेअरफूट जागा खरेदी केल्याची चर्चा आहे. स्नेहलनगर परिसरात असलेल्या डॉ.देशमुख याच्या निवासस्थानी त्याच्या आईची प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता त्याच्या आईने बोलण्यास स्पष्ट नकार दिला. सुरक्षा रक्षकाने त्यांची प्रकृती ठिक नसल्याने त्या बोलू शकत नसल्याचे सांगितले.
डॉ.प्रीतीश देशमुख हा दोन महिन्यातून वर्ध्यातील त्याच्या निवासस्थानी यायचा. आठ ते दहा दिवस राहून तो परत पुण्याला जायचा. अशी माहिती त्याच्या निवासस्थालगतच्या नागरिकांनी बोलताना दिली. मात्र, त्याने अल्पावधीतच एवढी माया कशी जमवली, याबाबत नागरिकही आर्श्चय व्यक्त करीत होते. वर्ध्यात कुठल्याही राजकीय मंडळींशी प्रितीशचे विशेष संबंध नसले तरी काही मंडळींनी पुलगाव व चांदूर (रेल्वे) भागातून नोकरीच्या निमित्ताने प्रितीशकडे संपर्क साधला होता. त्यांच्याकडून त्याने माया जमवली असावी, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. (Pritish Deshmukh, who was arrested in the paper leak scam, also bought property in Wardha)
इतर बातम्या