वर्धा : राज्यात शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आहेत. दोन गटांत शिवसेना विभागली गेल्याचं चित्र आहे. विदर्भात काही कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं आहेत. तर काही कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं उभे आहेत. कोणता झेंडा घेऊ हाती, असा शिवसेना सध्या दोन गटांत विभागली गेली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे निम्मे आमदार (MLA) सोबत घेत बंडखोरी केली आहे. यामुळे आता बंडखोरांविरोधात शिवसैनिक आक्रमक होताना दिसत आहे. वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव (Pulgaon) येथे शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली. राज्यावरील हे संकट (crisis) दूर होवो याकरिता देवाला साकडे घातले आहे. यावेळी शिवसैनिकांनी बंडखोर आमदार आपल्या क्षेत्रातून गेल्यास त्यांचं स्वागत चपलांनी करू अशी आक्रमक भूमिका घेतलीय.
पुलगावच्या स्टेशन चौकात कार्यकर्त्यांनी एकत्र येत हे आंदोलन केले. यावेळी घरच्या लोकांनी एकनाथ शिंदेसोबत जाऊन फार मोठा दगा दिला असल्याची भावना व्यक्त केली. बाळासाहेबांनी सांगितलं होत की, आपल्या पक्षातील आमदार, खासदार कुठेही पळो त्यांना जोड्याने हाणा. यामुळे आता आम्ही असच करणार आहोत. आमच्या क्षेत्रातून दगाबाज आमदार गेल्यास आम्ही त्यांचं स्वागत चपलांनी करू, अशी आक्रमक भूमिका घेतलीय.
एकनाथ शिंदे यांनी गीते यांचं नाव घेऊन असा कट करणं शिंदेना अशोभनीय आहे. बंडखोर म्हणतात की आमचा गट हे बाळासाहेबांची शिवसेना आहे. मग सोडून कशाला गेले, असाही आरोप यावेळी करण्यात आलाय. माजी उपजिल्हा प्रमुख आशिष पांडे यांनी आम्ही उद्धव ठाकरे यांच्यामागे असल्याचं सांगितलं. शिवसैनिकांकडून करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्त्याची उपस्थिती होती. यावेळी शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे विरोधात घोषणाबाजी सुद्धा केलीय.
नागपुरात एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देणारे फलकं लागलेत. एकनाथ शिंदे यांना मनापासून शुभेच्छा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शिंदे यांनी आत्मसात केले आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण पुढे घेऊन एकनाथ शिंदे जात आहेत. या मथड्याचे फलकं नागपुरात लावण्यात आलेत. वीर बजरंगी सेवा संस्थाननं हे फलकं लावलेत. एकनाथ शिंदे यांना राज्यातील काही ठिकाणांहूनही पाठिंबा मिळत आहे.