वर्धा : देवळी तालुक्यातील नागझरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत असलेल्या शिपायाने नैराश्येतून कार्यालयातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घडली आहे. एमपीएससी (MPSC) परिक्षेत अपयश आल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचचले आहे. किसन ढगे (29) असे आत्महत्या करण्यात आलेल्या शिपायाचे नाव असून तो परभणीतील रहिवासी आहे. ‘एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात अपयश आले. आई-वडिलांनी शेती विकून माझ्या शिक्षणावर खर्च केला पण, अपेक्षित नोकरी मिळत नाही’ असे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. (Suicide by hanging of a veterinary hospital peon due to failure in MPSC examination)
मयत किसन ढगे हा नागझरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या सात वर्षांपासून शिपाई पदावर कार्यरत होता. सध्या तो देवळी येथे भाड्याच्या घरात राहत होता. एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करुन मोठ्या पदावर जाण्याचे त्याचे स्वप्न होते. यासाठी तो सतत अभ्यास करीत होता. दवाखान्यात कार्यरत सुपरवायझरकडून त्याला अभ्यासाकरिता सहकार्य केले जात होते. याआधी त्याची पोलीस उपनिरीक्षक बनण्याची संधी अतिशय कमी गुणाने हुकली. परंतु याच परीक्षेत त्याच्या मित्रांना यश मिळाल्याने किसन दु:खी झाला होता.
घटनेच्या दिवशी त्याने मित्रांसोबत देवळीत जेवण केले. त्यानंतर नागझरी येथील दवाखान्यात रुजू होताच त्याने फेसबुकवर पोस्ट टाकून नोकरीचा भरती घोटाळा तसेच आरोग्यमंत्री आणि संबंधित मंत्री यांच्या कार्यपध्दतीचा निषेध करुन आत्महत्या करीत असल्याचे कळविले. ही फेसबुक पोस्ट पाहिल्यानंतर त्याच्या मित्रांनी तातडीने नागझरी गाठली असता तोपर्यंत सर्व संपले होते. मृत किसन ढगे हा अविवाहित असून एमपीएससीच्या परीक्षेत सातत्याने आलेल्या अपयशामुळे वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. मृतकाचे पुलगाव रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला. (Suicide by hanging of a veterinary hospital peon due to failure in MPSC examination)
इतर बातम्या