वर्धा : वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. अशात पुन्हा पारा वाढू लागला आहे. शनिवारी 14 मे रोजी वर्धा जिल्हा विदर्भात सर्वात हॉट (Wardha Hot) जिल्हा ठरला. तापमानात चांगलीच वाढ झाली. शनिवारी 46.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. ही यंदाच्या उन्हाळ्यातील विक्रमी नोंद आहे. मागील 24 तासांत तापमानात 2.3 अंशांची वाढ झाली. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून पार्याची कमान चढती आहे. 25 एप्रिल रोजी 45 अंश सेल्सिअस (Degrees Celsius) तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर 27 एप्रिल रोजी 45, 28 एप्रिल रोजी 45.1, 29 एप्रिल रोजी 45.5, 30 एप्रिल रोजी 45 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले (temperature reported) गेले.
मे महिन्यातही उष्ण वातावरण कायम आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. पण, आता पुन्हा पारा वाढू लागला आहे. शुक्रवारी 13 मे रोजी 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यामध्ये शनिवारी आणखी भर पडली. 24 तासांमध्ये तब्बल 2.3 अंशांनी तापमानात वाढ झाली. दिवसभर उन्हाचे तप्त चटक्यांमुळे बाहेर पडणे टाळत होते. रस्त्यांवरील वर्दळही कमी होती. विदर्भात वर्धा सर्वाधिक हॉट ठरले.
हवामान विभागाच्या वतीने तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमिवर प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. उन्हापासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
अकोला 44.6, अमरावती 44.8, बुलडाणा 40.7, ब्रह्मपुरी 45.4, चंद्रपूर 46.2, गडचिरोली 41.4, गोंदिया 43.8, नागपूर 45.4, वर्धा 46.5, वाशिम 43.5, यवतमाळ 45