वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील पोहणा-वेणी- शेकापूर मार्गावरील पुलावर खोल खड्डे पडले आहेत. पुलावरुन पाणी वाहत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरु आहे. सततच्या पावसामुळे नाल्याला पूर आला. पुराचे पाणी पुलावरुन वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. हिंगणघाट (Hinganghat) तालुक्यातील महामार्ग सातला लागून असलेल्या पोहणा ते शेकापूर मार्गावरील पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यातच रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना जाच सहन करावा लागत आहे. लगतच असलेल्या बाजारपेठेत (Market) याच रस्त्याने ग्रामस्थ जातात. बैलबंडी (Balbandi) घेऊन शेतकरी रस्त्यावरून जात असताना अनेकदा अपघाताच्या घटना घडताना दिसतात. ग्रामस्थांना या रस्त्याने प्रवास करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
खोल खड्डयांत पाणी साच असल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून वाट शोधावी लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत पाणी साचल्याने वाहतूक बंद पडते. पोहण्यावरून वेणीला लागूनच एक किलोमीटर अंतरावर पूल आहे. शेतकऱ्यांना बैलबंडी नेतानाही कमालीची कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाकडे अनेकदा तक्रारी करुनही अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांत रोष आहे. साधारण पाऊस जरी आला तरी गावाचा दोन दिवस संपर्क तुटतो. रस्ता व पुलाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी अमर मेसरे, जगदीश घुगरे, वानखेडे, अमोल दुरतकर, राहुल दुरतकर, सचिन महाजन, वाघ ,चरडे आदींसह शेतकरी तसेच विद्यार्थी व महिला मजुरांनी केली आहे.
शेकापूर आणि मांडवा या दोन गावादरम्यान जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ मजुरांनी पाच दुचाकी वाहने उभी करून ठेवली होती. पुलाजवळ वाहने ठेवून हे सर्व समृद्धीच्या कामावर पायदळ गेले होते. मुसळधार पावसामुळे समृद्धी मार्गावर पडणाऱ्या पावसाचे पाणी उंचावरून खाली वेगात वाहत आले. पाण्यासोबत समृद्धी मार्गाच्या कडेला असलेली माती दगडदेखील खाली आले. पाण्याच्या प्रवाहात पुलाशेजारी उभी असलेली वाहने चक्क वाहत गेली. रस्त्यापासून काही दूर अंतरावर असलेल्या खोल भागात महामार्गाचे पाणी जाऊन साचले. त्या पाण्यात वाहत गेलेली वाहने खड्डयात जाऊन पडली.