वर्धा : नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाने (Nagpur Hyderabad National Highway) छत्तीसगडकडे भरधाव ट्रॅव्हल्स जात होती. ट्रॅव्हल्स चालकाचे पिपरी (पोहणा)जवळ नियंत्रण सुटले. त्यामुळं ट्रॅव्हल्स नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेला टिप्परवर धडकली. हा भीषण अपघात बुधवारी रात्रीच्या सुमारास घडला. यात ट्रॅव्हल्सचा दुसरा चालक दुर्ग (छत्तीसगड) जिल्ह्यातील चांदखुरी येथील जगत बहादुरसिंग (वय 58) हा जागीच ठार झाला. इतर तीन जण जखमी झाले. या अपघाताची माहिती पिपरी पोहणा येथील नागरिकांना (Citizens at Pipri Pohna) मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रॅव्हल्समधील लोकांना बाहेर काढले. जाम महामार्ग पोलीस (Highway Police) तत्काळ घटनास्थळी पोहचले. गंभीर जखमींना उपचारासाठी तातडीने सेवाग्राम रुग्णालयात रवाना केले.
पिपरी (पोहणा) गावाजवळ रात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात ट्रॅव्हल्समधील प्रवासी जरा भयभित झाले होते. यावेळी पिपरी (पोहणा) येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व प्रवाशांना धीर देत जवळपास 100 प्रवाशांना गावातील बुध्द विहारात घेऊन गेले. त्याठिकाणी सर्वांना पोटभरून जेवण देत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली.
रस्त्याच्या बाजूला काही ठिकाणी अशाप्रकारे काही वाहन उभी असतात. हे अतिशय धोकादायक आहे. अशा वाहनांमुळं काही वेळा अपघात होतात. यात काहींचा जीव जातो. तर, काही जखमी होतात. त्यामुळं वाहन रस्त्यालगत ठेवताना काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा अशाप्रकारे विनाकारण काही लोकांचा जीव जाऊ शकतो. शिवाय वाहनं चालविताना ते काळजीपूर्वक चालविले पाहिजे. अतिवेगाने वाहन चालविणे म्हणजे अपघाताला आमंत्रण होय, हे लक्षात घेतले पाहिजे.