महेश मुंजेवार, प्रतिनिधी, वर्धा : नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यानंतर अनेक कामकाज स्मार्ट होऊ लागलं आहे. शासकीय कामकाज अधिक स्मार्ट व गतिमान होण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कालमर्यादेत सेवा उपलब्ध केली जात आहे. यासाठी ई-ऑफिस प्रणाली राबवली जात आहे. या प्रणालीचा जिल्हा, उपविभाग व तालुकास्तरावर अवलंब करणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. या प्रणालीमुळं कामाची गती तर वाढलीच कागदांचीही बचत होण्यास मदत मिळतेय.
वर्धा जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालयासोबतच आठही तहसील कार्यालयांत ई ऑफिस प्रणाली कामकाज होत आहे. सुरुवातीला आर्वी उपविभागातील तहसीलमध्ये सुरु करण्यात आलेली ही प्रणाली आता जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात कार्यान्वित झाली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा स्मार्ट प्रशासनावर भर असल्यानं अल्पावधीतच सर्व तहसील ई-ऑफिसने जोडली गेलेत.
सुरुवातीच्या काळात केवळ मंत्रालय आणि राज्यस्तरीय कार्यालयांमध्ये या प्रणालीचा अवलंब केला जात होता. पुढं जिल्हाधिकारी कार्यालय ई-ऑफिसनं जोडले गेले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी येथे रुजू झाल्यानंतर तीनही उपविभागीय कार्यालयांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित केली. सर्व तहसीलींमध्ये ही प्रणाली कार्यान्वित झाली आहे. कर्मचारीही कामं वेगान होऊन वेळेची बचत होत असल्याचं सांगतात.
ही गतीमान प्रणाली राबविण्यासाठी तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. महाआयटीनं तांत्रिक सहाय्य उपलब्ध केलंय. ई-ऑफिसच्या पेपरलेस कामकाजामुळं फाईली ऑनलाईन सादर होतात. ऑनलाईनच पुढे जात असल्यानं फाईलींचा निपटारा लवकर होतो. तसंच कामात पारदर्शकता, गतिमानतादेखील येते. नागरिकांचे कार्यालयात येणारे अर्ज, विनंत्या, तक्रारी देखील ई-ऑफिसद्वारे सादर होतात. त्यावरदेखील कालमर्यादेत कारवाई होते. विभागीय आयुक्तांनीही या कामाचं कौतुक केलंय.
अधिकार्यांनी पुढाकार घेतल्यास काम लवकर होतात. विविध अडचणी पार करत ई ऑफिस प्रणालीही वेगानं कार्यान्वित झालीय. तालुका स्तरावरदेखील ही प्रणाली सुरू झाल्यानं काम गतीनं होण्यास मदत झाली. असे वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच जिल्हा मंडळ अधिकारी राजीव बादाड यांनी सांगितले.