वर्धा : एकीकडे व्हायरल फ्लूचे मोठ्या संख्येने रुग्ण असताना आता स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढले आहे. वर्धा जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे तीन रुग्ण आढळले आहे. या तिघांमध्ये एक महिला, एक पुरुष तर एका तेरा वर्षीय मुलाचा समावेश आहे. तिघांपैकी दोघांवर सेवाग्राम रुग्णालयात (Sevagram Hospital) उपचार सुरु आहेत. एक रुग्ण गृहविलगीकरणात (Home Isolation) आहे. नागरिकांनी फ्लू सदृश्य लक्षण आढळल्यास जवळच्या वैद्यकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी राज पराडकर यांनी केले आहे. वर्धा जिल्ह्यात आढळलेल्या तीन रुग्णामध्ये एक 47 वर्षीय महिला वर्धा तालुक्याच्या वायफड (Wifad) येथील तर 67 वर्षीय तळेगाव टाळाटुले येथील इसमाचा समावेश आहे. दोन्ही सेवाग्राम रुग्णालयात दाखल आहे. 13 वर्षीय समुद्रपूर तालुक्यातील चिमुकल्याला सौम्य लक्षण असल्याने त्याला गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
वर्धा जिल्ह्यात सध्या पाच रुग्णांवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यापैकी तीन वर्धा जिल्ह्यातील तर एक गडचिरोली आणि एक आदिलाबाद येथील रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्याच्या सेवाग्राम आणि सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयात स्वाइन फ्लूच्या रुग्णांकारिता वेगळे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नागरिकांनी फ्लू सदृश्य आजार (सर्दी, खोकला, ताप ) जर लवकर बरा होत नसेल तर जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे तर दुसरीकडे आता स्वाइन फ्लूसारखा आजार ही डोके वर काढत आहे. जिल्ह्यात सध्या 72 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असून त्यापैकी 71 रुग्ण हे गृहविलगीकरणात आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे कीटकजन्य आजारही मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे.