वर्धा : वर्धा येथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यासह (District Supply Officer) त्याच्या खासगी सहकाऱ्याला २० हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्धेतील शासकीय विश्रामगृहात (In Government Rest House) केली. घटनास्थळी वेगवेगळ्या पॅकेटमध्ये तब्बल पाच लाख ६० हजार रुपये मिळाले. वर्धेतील शासकीय विश्रामगृहात लाच स्वीकारताना जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे (vijay sahare) आणि त्यांचा खासगी सहकारी ऋषिकेश ढोडरे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. रेशन दुकानदारांकडून काही जिल्हा पुरवठा अधिकारी लाचेची रक्कम घेतात अशी नेहमी चर्चा असते. पण, एका रेशन दुकानदाराने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यास इंगा दाखवला. कमीशनच्या नादात अधिकाऱ्याला आता नोकरीवरून कमी होण्याची वेळ आली. रेशन दुकानदाराच्या या धक्क्यामुळे अधिकारी शिकार झाला. मी लाच घेतली नाही असं म्हणण्याची वेळच त्याच्यावर आली नाही. तो रंगेहात पकडला गेला.
तक्रारदाराचे रेशनचे २ दुकान आहेत. तक्रारदारास रेशन दुकानाकरिता शासनातर्फे पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत कायदेशीर कमिशन मिळते. या कमिशनमधून तसेच २ रेशन दुकानाचे ७ महिन्याचे कमिशन अशी ५० हजार रुपयांची जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी मागणी केली.
त्यानंतर तडजोडीअंती ४० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. यातील ऋषिकेश ढोडरे यांच्यामार्फत विजय सहारे यांनी लाच स्वीकारताना दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले. रुमची तपासणी केली असता घटनास्थळी वेगवेगळ्या पाकिटात ५ लाख ६० हजार ३६० रुपये सापडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
रेशन दुकानदारांकडून जिल्हा पुरवठा अधिकारी अधिकचे पैसे मागतात. त्यानंतर दुकानदार रेशनग्राहकांना कमी धान्य देतात. २० किलो ऐवजी १५ किलो धान्य काही ग्राहकांना दिले जाते. याचा अर्थ ग्राहकाकडून खऱ्या अर्थाने लूट होते.
अन्यायग्रस्त प्रत्येक ग्राहक तक्रार करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे जाऊ शकत नाही. जे जातात त्याचे समाधान केले जाते. इतर गरजू ग्राहकांची लूट केली जाते. असा प्रकार सर्सास सुरू आहे. यात भरडला जातो तो शेवटचा ग्राहक जो खऱ्या अर्थाने गरजू असतो.