नंदुरबार : 16 ऑक्टोबर 2023 | पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकातून अजित पवार यांच्यावर आरोप केलाय. कुणीही प्रसिद्धीसाठी काहीही लेखन करतो. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लिखाण केलेल्या गोष्टींना काही आधार असतो, का? असा सवाल राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केलाय. अजित पवार यांची छबी संपूर्ण राज्याला माहित आहे. त्याचंही काम करण्याची पद्धत राज्याला माहित आहे. त्यामुळे मीरा बोरवणकर यांना कोणी हे लिहायला लावलं हे ही तपासण्याचे गरज आहे असे ते म्हणाले.
नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री अनिल पाटील यांनी चौफेर फटकेबाजी केली.
शरद पवार यांनी जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस या विषयावर बोलले आहेत. खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची हे निवडणूक आयोग ठरवेल कुणाला ते सांगायची गरज नाही, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला. राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर बोलता ते म्हणाले, सरकार आरक्षण देताना कुठल्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. सर्वच पक्षांची भूमिका मराठा समाजाला आरक्षण देण्याची आहे. ओबीसी समाजाला न्याय द्यायचा आहे. त्यामुळे सरकारकडून विचारपूर्वक निर्णय घेतले जात आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी अजित पवार सारखे मोदी मोदी करत आहेत अशी टीका केलीय. त्याला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, शिवसेना गेली २५ वर्ष भाजपच्या दारासमोर पाणी भरत होती का? इतके दिवस त्यांनी काय केले? आता अजित दादा यांनी मोदी मोदी करावं नाही तर काय करावे हा ज्यांच्या त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना २५ वर्ष झक मारत होती का?असा जळजळीत सवाल केला.