विठ्ठल देशमुख, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, वाशिम : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात बोलताना 6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं असं विधान केलं. त्यांच्या या विधानाला माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख सहमती दर्शवली आहे. या राज्यामध्ये दंगली घडवण्यासाठी जाणीवपूर्वक या शिंदे सरकारचं षडयंत्र चालू आहे. मराठा-ओबीसी समाजामध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं. वाशिमंध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठकी झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत मांडलं.
छगन भुजबळ यांना मी जेलबाहेर काढलं. पण त्यांनी त्याबाबत कधी माझे आभार मांडले नाहीत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावरही अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या घटनेला आता पंधरा वर्षे झाली आहेत. त्यावेळेस काय झालं ते कशाला खोदून काढता, असं म्हणत देशमुख यांनी या प्रश्नाला बगल दिली.
राष्ट्रवादीने जर सरकार पाडले नसतं, तर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला असता, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावरही अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी त्यांचं वक्तव्य अद्याप ऐकलेलं नाही. मी त्यांचं व्यवस्थित वक्तव्य आहे आणि त्यांच्यासोबत फोनवर चर्चा करू आपल्याशी बोलतो, असं अनिल देशमुख म्हणालेत.
भाजप नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्यावर टिका केली होती की,शरद पवार पावसात भिजले. याआधीच राष्ट्रवादीचे दोन भाग झाले. मात्र आता पुन्हा भिजल्यानंतर राष्ट्रवादी लोणच्या एव्हढी शिल्लक राहणार नाही, असं वक्तव्य केलं. त्यावरही अनिल देशमुख यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. आशिष शेलार यांना सांगा साताऱ्यामध्ये 2019 ला शरद पवार पावसात भिजले. त्यामुळे भाजपा सरकार सत्तेत येऊ शकलं नाही. आमचं सरकार आल्यानंतर एजन्सीचा दुरुपयोग करून त्यांनी पक्ष फोडला. परवा पवार साहेब ठाण्यामध्ये भिजले हा 2024 साठी शुभ शकुन आहे, असं अनिल देशमुख म्हणाले.